
आयसीसीने महिला क्रिकेट वर्ल्ड कप गाजवणाऱ्या खेळाडूंचा सर्वोत्तम संघ जाहीर केला असून त्यात हिंदुस्थानच्या तीन रणरागिणींना स्थान देण्यात आले आहे. स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज आणि दीप्ती शर्मा या तिघींचा समावेश या सर्वोत्तम संघात करण्यात आला आहे. त्यामुळे वर्ल्ड कपच्या सर्वोत्तम संघावरही हिंदुस्थानी खेळाडूंनी आपला ठसा उमटवला आहे. या तिघींनी आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर हिंदुस्थानला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवण्यात मोलाची भूमिका बजावली. माजी जगज्जेत्या ऑस्ट्रेलिया, उपविजेत्या दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडच्या खेळाडूंनाही या संघात स्थान मिळाले, तर पाकिस्तानची यष्टिरक्षक सिद्रा नवाझलाही स्थान लाभले आहे.
वोल्फार्ड्टचा आफ्रिकन जलवा
दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्फार्ड्टने वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक 571 धावा केल्या नाहीत, तर उपांत्य आणि अंतिम फेरीत सलग शतके झळकावण्याचा पराक्रमही केला. या भन्नाट कामगिरीमुळे ती संघात मानाने आली आणि संघाचे नेतृत्वही तिच्याकडेच सोपवण्यात आले. या संघात लॉरासह मॅरिझेन कॅप आणि नादिन डी क्लार्कचीही निवड करण्यात आली आहे. तसेच ऑस्ट्रेलियाच्या तीन आणि इंग्लंडच्या दोन खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे. ही टीम निवडण्याचे काम प्रतिष्ठत तज्ञांच्या समितीने केले, ज्यात इयान बिशप, मेल जोन्स, ईसा गुहा, गौरव सक्सेना आणि पत्रकार अॅस्टल वासुदेवन यांचा समावेश होता.
हिंदुस्थानच्या तीन सिंहिणींची गर्जना
स्पर्धेत जोरदार कामगिरी करणाऱ्या स्मृतीने 434 धावा केल्या. तिच्या स्थैर्यामुळे हिंदुस्थानची फलंदाजी अधिक भक्कम बनली होती. तसेच उपांत्य फेरीत 127 धावांची झुंजार खेळी करणारी जेमिमा रॉड्रिग्जही संघात दाखल झाली आहे. तिची हीच खेळी अफलातून ठरली. या दोघींपाठोपाठ 22 विकेटची विक्रमी कामगिरी करणाऱ्या दीप्ती शर्माच्या फिरकीलाही मानाचे स्थान लाभले आहे. अंतिम सामन्यातील तिची अचूक आणि शिस्तबद्ध गोलंदाजी विरोधकांसाठी डोकेदुखी ठरली होती.
महिला वर्ल्ड कप सर्वोत्तम संघ
स्मृती मानधना (हिंदुस्थान), लॉरा वोल्फार्ड्ट – कर्णधार (द. आफ्रिका), जेमिमा रॉड्रिग्ज (हिंदुस्थान), मॅरिझेन कॅप (द. आफ्रिका), अॅश्ले गार्डनर (ऑस्ट्रेलिया), दीप्ती शर्मा (हिंदुस्थान), अनाबेल सदरलंड (ऑस्ट्रेलिया), नादिन डी क्लर्क (द. आफ्रिका), सिद्रा नवाझ – यष्टिरक्षक (पाकिस्तान), अलाना किंग (ऑस्ट्रेलिया), सोफी अॅकलस्टोन (इंग्लंड), 12 वी खेळाडू ः नेट सिव्हर-ब्रंट (इंग्लंड).


























































