
दहिसर टोलनाका हलवून तो वसईच्या हद्दीत आणण्याच्या निर्णयाला वसईच्या भूमिपुत्रांनी कडाडून विरोध केला. या टोलनाक्याच्या जागेची पाहणी करण्यासाठी आलेले परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासमोर भूमिपुत्रांनी अक्षरशः राडा केला. आधी रस्ते खड्डेमुक्त करा, नंतरच इथे पाऊल टाका, चले जाव चले जाव सरनाईक चले जाव, नॅशनल हायवे हाय हाय अशा घोषणा देत भूमिपुत्रांनी परिसर दणाणून सोडला. त्यांचा रुद्रावतार पाहून अखेर सरनाईक यांनी काढता पाय घेतला.
वाहतूककोंडी सुटावी यासाठी दहिसर टोलनाका स्थलांतरित करण्यात येत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यानुसार सरनाईक यांनी त्याबाबतच्या हालचाली सुरू केल्या. 8 नोव्हेंबर रोजी टोलनाका स्थलांतरित केला जाईल अशी घोषणा सरनाईक यांनी केली होती. त्यातच भाजप नेते आणि पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांचा हा टोलनाका वसईजवळ स्थलांतरित करण्यास विरोध होता
याच पार्श्वभूमीवर आज सरनाईक यांनी टोलनाकासंदर्भात ससूनवघर येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसह पाहणी दौरा केला. यावेळी काँग्रेस नेते विजय पाटील, भूमिपुत्र फाऊंडेशनचे अध्यक्ष सुशांत पाटील यांच्यासह शेकडो स्थानिक गावकऱयांनी एकत्र येत सरनाईकांच्या दौऱ्याला कडकडून विरोध केला.
मुंबईचा टोलनाका वसईच्या उरावर का?
दहिसर टोलनाका हा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळ मार्गावर आहे.तर वर्सोवा पुलाजवळून जाणारा मार्ग हा महामार्ग प्राधिकरणाच्या अंतर्गत येतो. त्यामुळे कायद्यानुसार दहिसरचा टोलनाका वसईच्या हद्दीतील ससूनवघर येथे स्थलांतरित केला जाऊ शकत नाही. आम्ही हा टोलनाका होऊ देणार नाही, अशी भूमिका स्थानिक भूमिपुत्रांनी घेतली आहे.
दहिसरला जाणाऱ्यांनाही विनाकारण टोलचा भुर्दंड पडेल
जर हा नाका वर्सोव्याला झाला तर मुंबई-अहमदाबाद महामार्ग, ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गांवर कोंडी होईल. हा पथकर नाका म्हणजे मुंबईचे प्रवेशद्वार आहे. पण तो जर वर्सोव्याला स्थलांतरित झाला तर दहिसरला जाणाऱ्यांनाही विनाकारण टोल भरावा लागेल अशी तक्रार सुशांत पाटील यांनी केली.

























































