दिल्लीतील स्फोटावर पंतप्रधान मोदी भूतानमध्ये बोलले, षडयंत्र करणाऱ्यांना सोडणार नाही

 

मंगळवारी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात 13 जणांचा मृत्यू झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कठोर इशारा दिला आहे. भूतानच्या थिम्फूमध्ये बोलताना मोदी म्हणाले की, या घटनेमागील कटकारस्थान करणाऱ्यांना सोडले जाणार नाही. सर्व जबाबदारांना कोर्टात उभे केले जाईल.”
पंतप्रधान मोदी हे भूतानचे राजा जिग्मे सिंग्ये वांगचुक यांच्या 70 व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी शेजारील देशात दोन दिवसांच्या दौऱ्यावर थिम्फूमध्ये पोहोचले आहेत.

एका सार्वजनिक कार्यक्रमात भाषण करताना पंतप्रधान मोदी यांनी या स्फोटाला भयानक म्हटले आणि प्रभावित कुटुंबांशी आपली संवेदना व्यक्त केली. पंतप्रधान म्हणाले, “आज मी येथे अतिशय जड अंतकरणाने आलो आहे. काल संध्याकाळी दिल्लीमध्ये घडलेल्या भीषण घटनेने सर्वांच्या मनाला वेदना दिल्या आहेत.मी पीडित कुटुंबांचे दु:ख समजू शकतो. आज संपूर्ण देश त्यांच्यासोबत उभा आहे.”

ते पुढे म्हणाले, “मी काल रात्रभर या घटनेच्या चौकशीमध्ये गुंतलेल्या सर्व एजन्सींशी आणि सर्व महत्त्वाच्या व्यक्तींशी संपर्कात होतो. त्यांच्याशी सतत विचारविनिमय चालू होता. माहितीचे धागेदोरे जोडले जात होते. आपल्या तपास यंत्रणा या कटकारस्थानाच्या मुळापर्यंत पोहोचतील. या हल्ल्यामागील षड्यंत्रकर्त्यांना अजिबात सोडले जाणार नाही असे मोदी म्हणाले.