
ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पूल बंद केल्यापासून प्रवाशांची गैरसोय झाली असतानाच बुधवारी सायंकाळी त्या गैरसोयींमध्ये मोठी भर पडली. पुलाखालील भुयारी मार्ग अचानक बंद करण्यात आला आणि पुलाच्या अरुंद पायऱ्यांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली. भुयारी मार्ग बंद केल्यामुळे प्रवाशांना वळसा घालून इच्छित ठिकाणी जावे लागले. प्रशासन कोणतीही आगाऊ सूचना न देता मार्गांमध्ये बदल करीत असल्याने प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
125 वर्षे जुन्या एल्फिन्स्टन पुलाचा बहुतांश भाग जमीनदोस्त करण्यात आला. केवळ रेल्वेच्या हद्दीतील लोखंडी सांगाडा अद्याप ‘जैसे थे’ आहे. पुलाच्या त्या अर्धवट भागातून रेल्वे प्रवासी आणि पादचाऱ्यांची ये-जा सुरू असते. पुलाखालील भुयारी मार्ग मध्य आणि पश्चिम या दोन्ही रेल्वे मार्गांवरील प्रवाशांसाठी सोयीचा होता. हा भुयारी मार्ग कोणतीही आगाऊ सूचना न देता बुधवारी बंद करण्यात आला. त्यामुळे सायंकाळी कार्यालयातून घरी परतणाऱ्या नोकरदार मंडळींची बंद केलेल्या भुयारी मार्गाच्या दोन्ही बाजूला कोंडी झाली. पुलाच्या पायऱ्यांचा भाग फार अरुंद असून तेथून प्रवाशांना दाटीवाटीने ये-जा करावी लागली. रात्रीपर्यंत हाच गोंधळ सुरू राहिल्याने चेंगराचेंगरी होण्याची भीती निर्माण झाली होती. भुयारी मार्गाच्या परिसरात अंधाराचे साम्राज्य होते. त्यातच गर्दी झाल्याने महिला प्रवाशांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले होते. प्रवाशांनी प्रशासनाच्या कारभारावर संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या.
स्थानिक नागरिक, प्रवाशांचे हाल होणार
एल्फिन्स्टन पुलाखालील भुयारी मार्ग बंद केल्याचा फलक लावण्यात आला आहे. त्यावर पूर्व आणि पश्चिम दिशेला जाण्यासाठी ‘साऊथ रेल्वे’ पादचारी पूल किंवा ‘नॉर्थ रेल्वे’ पादचारी पुलाचा वापर करण्याची सूचना केली आहे. ही सूचना नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करणारी ठरली आहे. एल्फिन्स्टन पुलाचा तिकीट खिडकी असलेला भाग पूर्णपणे बंद केल्यानंतर रेल्वे प्रवासी आणि स्थानिक नागरिकांना पर्यायी मार्गांचा वळसा घालताना त्यांचे प्रचंड हाल होणार आहेत.
एमएमआरडीए आणि पालिकेत समन्वय नाही
एल्फिन्स्टन पुलाचे पाडकाम व पुनर्बांधणीच्या टप्प्यावर एमएमआरडीए, महारेल, पालिका आणि रेल्वे अशा विविध यंत्रणांचा परस्परांशी संबंध येत आहे. महारेलने पुलाचे काम वेळीच पूर्ण करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत, मात्र उर्वरित कामांमध्ये एमएमआरडीए आणि पालिका प्रशासन यांच्यात समन्वय नसल्याचे वेळोवेळी स्पष्ट होत आहे. कामाशी संबंधित कोणत्याही मुद्द्यावर पालिका आणि एमएमआरडीए एकमेकांकडे बोट दाखवत आहेत.





























































