हिंदुजा-टाटाच्या आंतर रुग्णालयीन क्रिकेट स्पर्धेला आजपासून प्रारंभ

मुंबईच्या रुग्णालयातील क्रिकेटपटूंसाठी वर्ल्ड कप असलेली गिरनार आंतर रुग्णालयीन क्रिकेट स्पर्धा 13 नोव्हेंबरपासून सुरू होत असून ग्लेन इगल्स विरुद्ध नानावटी या रुग्णालयांमध्ये उद्घाटनीय सामना खेळविला जाईल. नामवंत 16 संघांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा माजी कसोटीपटू प्रवीण अमरे यांच्या हस्ते पार पडणार असल्याची माहिती आयोजक मिलिंद सावंत यांनी दिली.

गेली 31 वर्षे अविरतपणे या स्पर्धेचे जोरदार आयोजन हिंदुजा रुग्णालय आणि टाटा रुग्णालय संयुक्तपणे करत आहे. या दोन्ही रुग्णालयात सेवेत असलेले क्रिकेटपटू या स्पर्धेचे आत्मीयतेने आयोजन करत असल्यामुळे मुंबई क्रिकेट क्षेत्रात या स्पर्धेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. मिलिंद सावंत आणि डॉ. हुमायूं जाफरी यांनी पुढाकार घेत 1994 साली खासगी आणि सरकारी रुग्णालयात क्रिकेटपटूंना कायमस्वरूपी नोकरी लाभावी म्हणून या स्पर्धेचा श्रीगणेशा केला होता. जी स्पर्धा आजही जोशात सुरू आहे. ही स्पर्धा एपंदर दोन गटांत खेळविली जाणार असून एलिट गटात अव्वल दर्जाच्या आठ रुग्णालयांचे संघ खेळतात तर प्लेट गटातही आठ संघ आपला जोरदार खेळ दाखवतात, अशी माहिती संयुक्त सचिव अनिल बैकर यांनी दिली.