
गाळप हंगाम सुरू होऊन जवळपास महिना उलटला, तरी जयवंत शुगर कारखान्याने उसाचा दर जाहीर न केल्याने ऊस उत्पादक शेतकऱयांच्या रोषाला अखेर आज वाचा फुटली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली इंदोली एसटी स्टॅण्ड चौकात तीक्र आंदोलन करीत शेतकऱयांनी कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतूक रोखून धरली.
शेकडो ऊस उत्पादक शेतकरी ठरल्याप्रमाणे सकाळी 11 वाजता एकत्र जमले. काही वेळातच ‘जयवंत शुगर’कडे जाणारी ऊस वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. आंदोलनाचा ताण वाढताच कारखान्याचे व्यवस्थापन तातडीने चर्चेसाठी घटनास्थळी दाखल झाले. अखेर कारखान्याकडून येत्या शनिवारी (15 रोजी) उसाचा दर जाहीर करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याची घोषणा शेतकऱयांनी केली. मात्र, जाहीर होणारा दर हा कोल्हापूर जिह्यातील कारखान्यांच्या समतुल्य नसेल, तर पुढचे आंदोलन अधिक तीक्र आणि निर्णायक असेल, असा इशारा शेतकऱ्यांनी रोखली दिला.
या आंदोलनात ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, अर्जन साळुंखे, देवानंद पाटील, दादासाहेब यादव, प्रमोदसिंह जगदाळे, बापूसाहेब साळुंखे, रामचंद्र साळुंखे यांच्यासह मोठय़ा संख्येने ऊस उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते.


























































