
महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी निघालेल्या आरक्षण सोडतीत अनेकांची घोर निराशा झाली, तर अनेकांना लॉटरी लागली आहे. ‘कहीं खुशी कहीं गम’, अशी स्थिती निर्माण झाली आहे. माजी महापौर कांचन कांबळे, संगीता खोत, गीता सुतार, माजी उपमहापौर आनंदा देवमाने, माजी सभापती अजिंक्य पाटील, हरिदास पाटील, पांडुरंग कोरे, संगीता हारगे यांच्यासह अनेक दिग्गजांना फटका बसला. अनेकांची आरक्षणे कायम राहिल्याने त्यांना पुन्हा संधी मिळणार, तर काही ठिकाणी नव्या चेहऱयांना संधी मिळणार आहे.
सांगली महापालिकेच्या निवडणुकीसाठी अंतिम प्रभागरचना झाली. त्यानंतर मंगळवारी (दि. 11) 20 प्रभागांतील आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पडली. यामध्ये अनुसूचित जातीसाठी 11, अनुसूचित जमातीसाठी एक, नागरिकांच्या मागास प्रवर्गसाठी 21, तर खुल्या 45 जागा राखीव ठेवण्यात आल्या. यापैकी 50 टक्के जागा म्हणजे 39 जागा महिलांसाठी राखीव झाल्या.
आरक्षण सोडतीमध्ये अनेक दिग्गजांना फटका बसला आहे. माजी महापौर कांचन कांबळे यांच्या प्रभाग 11 मध्ये अनुसूचित जाती महिलेसाठी असलेले आरक्षण यावेळी अनुसूचित जातीसाठी निघाले. त्यामुळे त्यांची संधी गेली आहे. त्यांच्या जागी पुरुष उमेदवाराला आता संधी मिळेल. तर माजी महापौर संगीता खोत यांच्या प्रभाग 7 मध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षण आहे. महिलांसाठी राखीव असणारी जागा खुली झाल्याने त्यांना आरक्षणाचा फटका बसला. प्रभाग क्रमांक 17 मध्येदेखील तसाच प्रकार झाला आहे. महिला नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी असलेली जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आता खुली झाली आहे.
माजी उपमहापौर आनंदा देवमाने यांच्या प्रभाग क्र.7 मध्येदेखील आरक्षणाचा फटका बसला आहे. त्यांच्या प्रभागातील अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेली जागा महिलेसाठी राखीव झाली. त्यामुळे त्यांचा पत्ता कट झाला आहे. स्थायी समितीचे माजी सभापती अजिंक्य पाटील व हरिदास पाटील यांच्या सांगलीवाडी येथील प्रभाग 13 मध्ये असलेल्या तीन जागांपैकी दोन जागा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्या, तर एक जागा ओबीसीसाठी खुली आहे. त्यामुळे अजिंक्य पाटील, हरिदास पाटील, दिलीप पाटील यांना निवडणूक लढविता येणार नाही.
मिरजेतील प्रभाग 20मध्ये एक जागा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव होती. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षा संगीता हारगे यांना धक्का बसला आहे. त्यांच्या प्रभागात सर्वसाधारणसाठी जागा खुली झाली आहे. त्यामुळे त्या निवडणूक लढण्याची शक्यता कमी आहे. तर, दुसरीकडे मिरज येथील प्रभाग 5मधील नागरिकांच्या मागास प्रवर्गाची असलेली जागा महिलांसाठी राखीव झाल्याने स्थायी समितीचे माजी सभापती पांडुरंग कोरे यांचा पत्ता कट झाला आहे.
प्रभाग 16 मधून सुनंदा राऊत, स्वाती शिंदे यांपैकी एकाला संधी मिळणार आहे. कारण या प्रभागात सर्वसाधारण महिलेसाठी एकच जागा आरक्षित झाली आहे. तर, माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, मनोज सरगर, संजय मेंढे, सोनाली सागरे, राजेंद्र कुंभार, शिवाजी दुर्वे, योगेंद्र थोरात, संजय यमगर, सुब्राव मद्रासी, सविता मदने आदींनादेखील धक्का बसला आहे. त्यांना निवडणूक लढविण्यासाठी खुल्या प्रवर्गाच्या जागेतून प्रयत्न करावे लागणार आहेत.
दुसरीकडे अनेक प्रभागांतील आरक्षणे कायम राहिल्याने आनंद व्यक्त केला जात आहेत. माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, मैनुद्दीन बागवान, माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी, स्थायीचे माजी सभापती संतोष पाटील, संदीप आवटी, निरंजन आवटी, भाजपचे प्रकाश ढंग, माजी नगरसेवक मंगेश चव्हाण, शेडजी मोहिते, सविता मोहिते, कल्पना कोळेकर, विष्णू माने, पद्मिनी पाटील, विजय घाडगे, गजानन मगदूम, करण जामदार, रोहिणी पाटील, प्रकाश मुळके, वर्षा निंबाळकर, शुभांगी साळुंखे, लक्ष्मी सरगर, भारती दिगडे, फिरोज पठाण, आरती वळवडे, उत्तम साखळकर, तौफिक शिकलगार आदींच्या जागा सुरक्षित आहेत.
आरक्षणाचा या प्रमुखांना बसला फटका
माजी महापौर कांचन कांबळे, संगीता खोत, गीता सुतार, माजी उपमहापौर आनंदा देवमाने, माजी सभापती अजिंक्य पाटील, पांडुरंग कोरे, संगीता हारगे, माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, मनोज सरगर, मिरज काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संजय मेंढे, योगेंद्र थोरात, सबुराव मद्रासी, सोनाली सागरे, राजेंद्र कुंभार, शिवाजी दुर्वे, सविता मदने, संजय यमगर आदींना या आरक्षणाचा फटका बसला आहे.
सांगलीवाडीत मोठा धक्का; मिरजेतील तीन प्रभागांची चांदी
सांगलीवाडी येथील प्रभाग 13 मध्ये सर्वसाधारण महिलेसाठी दोन जागा, तर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी एक जागा राखीव पडली आहे. त्यामुळे स्थायी समितीचे माजी सभापती अजिंक्य पाटील, हरिदास पाटील, माजी नगरसेवक दिलीप पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. सांगलीवाडीतील ‘पाटील’ यावेळी महापालिकेत महिलांच्या माध्यमातून प्रवेश करतील, तर दुसरीकडे मिरज शहरातील प्रभाग चार, पाच, सहा व सांगलीतील प्रभाग बारामध्ये सर्वसाधारणच्या दोन जागा आहेत. त्यामुळे या ठिकाणी इच्छुकांची चांगली सोय झाली आहे.





























































