राष्ट्रवादीला मोठा दिलासा, निवडणूक आयोगाने ‘पिपाणी’ चिन्ह अखेर वगळलं

निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा दिलासा दिला आहे. आयोगाने निवडणूक चिन्हांच्या यादीतून पिपाणी हे चिन्ह वगळलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं पिपाणी या निवडणूक चिन्हावर आक्षेप घेतला होता. या चिन्हामुळे पक्षाला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत नुकसान झालं होतं. त्यांनी हे चिन्ह गोठवण्याची वारंवार मागणी केली होती, जी अखेर आज निवडणूक आयोगाने मेनी केली आहे.

याचबद्दल माहिती देताना X वर एक पोस्ट करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले आहेत की, “लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत या चिन्हामुळे कार्यकर्त्यांना आणि मतदारांना मोठा गोंधळ निर्माण झाला, त्याची राजकीय किंमत पक्षाला चुकवावी लागली होती. हा निर्णय जर आधीच घेतला गेला असता, तर आज महाराष्ट्रातील आणि देशातील राजकीय चित्र नक्कीच वेगळं असतं.”

ते म्हणाले, “शेवटी उशिरा सुचलेलं शहाणपण अस याला म्हणावं लागेल. निवडणूक चिन्हातून ‘पिपाणी (ट्रम्पेट)’ हे चिन्ह कायमचे वगळल्याबद्दल निवडणूक आयोगाचे आभार. हा निर्णय लोकशाही आणि स्वच्छ निवडणूक प्रक्रियेसाठी एक सकारात्मक पाऊल आहे.”