
बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये एनडीए आणि महागठबंधनमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळाली. मात्र दुपारपर्यंत चित्र हळूहळू स्पष्ट होत गेले आणि एनडीएची गाडी सुसाट निघाली. आधी एनडीएने 122 हा बहुमताचा आकडा पार केला, आणि नंतर थेट 180 पार उडी घेतली.
निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार भारतीय जनता पक्ष 84, तर जनता दल युनायटेड 76 जागांवर आघाडीवर आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये जेडीयूने जबरदस्त कमबॅक करत जवळपास दुप्पट जागांवर बाजी मारली आहे. 2020 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जेडीयूने 43 जागा जिंकल्या होत्या, तर आता 76 जागांवर आघाडीवर आहे. याचा अर्थ गेल्या निवडणुकीच्या तुलनेत जेडीयूने 33 जागा जास्त मिळवल्या आहेत. अंतिम निकाल हाती येईपर्यंत यात थोडा फार बदल होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे जेडीयूने मुसंडी मारली असली तरी सर्वाधिक फटका राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसला बसला आहे. राजद सध्या 35 जागांवर, तर काँग्रेस 6 जागांवर आघाडीवर आहे. गेल्या निवडणुकीत राजद सर्वात मोठा पक्ष ठरला होता. राजदने 75 जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेसने 19 जागांवर विजय मिळवला होता. मात्र यंदा या दोन्ही पक्षांना जबरदस्त फटका बसला आहे.
PTI INFOGRAPHICS | Bihar Election Results 2025: Trends/results updated at 11:42 am#BiharElectionsWithPTI #BiharResultsWithPTI https://t.co/WtxwOuytPb pic.twitter.com/aflxxmPTY5
— Press Trust of India (@PTI_News) November 14, 2025
लालूंचे दोन्ही पुत्र पिछाडीवर
बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे दोन्ही पुत्र पिछाडीवर आहेत. राघोपूर मतदारसंघातून तेजस्वी यादव आणि महुआ मतदारसंघातून तेज प्रताप यादव पिछाडीवर आहेत. तेज प्रताप यादव यांची थेट चौथ्या स्थानावर घसरगुंडी झाली आहे.

























































