
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालामुळे मतमोजणीत घोळ होतो यावर शिक्कामोर्तब झाल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. सरकारचं बुजगावणं झालेल्या यंत्रणा, निवडणूक आयोग यामुळे एकंदरीतच लोकशाही आणि पर्यायाने आरक्षण व संविधान धोक्यात आलंय हे नक्की, अशी टीकाही रोहित पवार यांनी केली.
दोन टप्प्यात झालेल्या बिहार निवडणुकीचे निकाल शुक्रवारी समोर आले. सुरुवातीला एनडीए आणि महागठबंधनमध्ये कांटे की टक्कर सुरू असल्याचे दिसले. मात्र दुपारनंतर अचानक एनडीएने मोठी आघाडी घेतली आणि बहुमताचा आकडा गाठला. यानंतर रोहित पवार यांनी ट्विट करत भाजप, निवडणूक आयोगावर हल्ला चढवला.
हरयाणा, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीकडे जनतेचा कौल होता. हे चित्र पोस्टल मतदानात देखील स्पष्ट झाले होते. EVM व्होटिंगदरम्यान पहिला एक तास हा कल पोस्टलप्रमाणेच राहिला. परंतु पुढच्या एक दीड तासात सर्व चित्र पालटले. भाजपा आश्चर्यकारक रित्या पुढे गेली आणि धक्कादायक निकाल समोर आला. आज सेम-टू-सेम याच पद्धतीचे चित्र बिहार निवडणुकीदरम्यान निकाल येताना दिसत आहे. येणाऱ्या निकालाने मतदान मोजणीत घोळ होतो यावर शिक्कामोर्तब झालं आहे. सरकारचं बुजगावणं झालेल्या यंत्रणा, निवडणूक आयोग यामुळे एकंदरीतच लोकशाही आणि पर्यायाने आरक्षण व संविधान धोक्यात आलंय हे नक्की, अशी पोस्ट रोहित पवार यांनी एक्सवर केली आहे.
महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा गुवाहाटी व्हाया सुरत जसा प्रवास झाला तसाच निवडणूक निकाल लावण्याचा आयोगाचा प्रवास हरियाणा टू बिहार व्हाया महाराष्ट्र असा दिसून येतो, असा टोलाही रोहित पवार यांनी हाणला.
हरियाणा, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीकडे जनतेचा कौल होता. हे चित्र पोस्टल मतदानात देखील स्पष्ट झाले होते. #EVM व्होटिंगदरम्यान पहिला एक तास हा कल पोस्टलप्रमाणेच राहिला. परंतु पुढच्या एक दीड तासात सर्व चित्र पालटले. भाजपा आश्चर्यकारक रित्या पुढे गेली आणि धक्कादायक…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 14, 2025
असो, ही निवडणूक थेट बिहारची जनता विरुद्ध इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्यात आहे. तेजस्वी यादव यांना मिळालेला प्रतिसाद त्यांच्या सभांमध्ये उसळलेला जनसागर आणि त्यांनी युवांचे, शेतकऱ्यांचे मांडलेले प्रश्न बघता आजचा निकाल काहीही लागला, तरी जनतेची खरी पसंद आणि जनतेच्या मनातला मुख्यमंत्री मात्र तेजस्वी यादव आहेत यात तिळमात्र शंका नाही, असेही रोहित पवार यांनी म्हटले.
बिहार निवडणूक निकालावर संजय राऊत यांचं ट्विट, एकदम महाराष्ट्र पॅटर्न!


























































