देखणे न देखणे – शब्द बापुडे केवळ वारा…

>> डॉ. मीनाक्षी पाटील, [email protected]

आदिम भाषेतील एकेक शब्द म्हणजे मानवी जाणिवेचा अंतःस्फूर्त असा आकार. आपण आपल्या भवतालाचे चिंतन, मनन आणि आकलन हे सारे भाषेच्या माध्यमातून करीत असतो. त्यामुळे संपूर्ण विश्वाविषयीचे आपले सारे आकलन व त्यानुसार एकूण जगणे हे भाषेने नियत झालेले असते. या अर्थाने मानवी संस्कृतीच्या विकसनात भाषेची निर्मिती ही अत्यंत निर्णायक असून कोणतीही संस्कृती ही भाषेशिवाय अस्तित्वातच येऊ शकत नाही.

बाह्य विश्वाकडून ज्या विविध संवेदना माणसांच्या अनुभवाला येतात, त्या विविध संवेदनांना दिलेला मानस आकार म्हणजे एकेक नवीन शब्द असतो. आदिम काळापासून मनुष्यप्राणी हा निसर्गातल्या वेगवेगळ्या शक्तींशी, पशुप्राण्यांशी कधी संघर्ष करीत, तर कधी संवाद, अनुकरण करीत मार्गक्रमण करीत आला आहे. या साऱया प्रवासात सभोवतालच्या चराचर सृष्टीशी एक प्रकारच्या अभिन्नतेचाही अनुभव तो घेत आला असून त्यातून त्याचे भावविश्व समृद्ध होत गेले आहे. आरंभापासूनच सभोवतालच्या निसर्गाच्या अधीन होऊन जगण्यापेक्षा निसर्गालाच आपल्या अधीन करून जगण्याचा प्रयत्न मनुष्यप्राणी करीत आला आहे.

आदिम काळातील माणूस हा शिकार करताना नाचत व गात असला, चित्रे काढत असला तरी त्यास निखळ अर्थाने कला म्हणता येणार नाही, तर त्या निर्मितीमागची प्रेरणा प्रामुख्याने जैविक होती. त्या नृत्यामागचा, चित्रनिर्मितीमागचा प्रमुख हेतू मात्र यातुमूलक म्हणजे अदृश्य अशा वैश्विक शक्तीच्या सहाय्याने जादू, मंत्रतंत्र करून हव्या त्या गोष्टींवर नियंत्रण मिळवणे या स्वरूपाचा होता. आदिमानवाकडून शिकारीच्या वेळी केल्या जाणाऱया नाचगाण्यांमुळे निर्माण होणाऱया विशिष्ट नादातून पशुपक्ष्यांना भूल पाडण्यासाठी झालेला ध्वनीचा, भाषेचा वापर हा यातुमूलकच असावा अशी एक शक्यता भाषाभ्यासकांकडून व्यक्त केली जाते. एखाद्या शब्दाच्या किंवा ध्वनीच्या उच्चारणाने केवळ त्या वस्तूचा निर्देशच होतो असे नव्हे, तर त्या वस्तूची शक्तीही त्या नावात वसत असते अशी आदिमानवाची श्रद्धा होती.

या साऱया प्रक्रियेत माणसांना प्राप्त झालेल्या भाषेचा विचार केला तर असे लक्षात येते की, भाषा ही समूहात जन्माला येते आणि तिचे अस्तित्व चिन्ह रूप असते. चिन्हांद्वारे वस्तूंचा, द्रव्याचा, गुणांचा किंवा एखाद्या क्रियेचा निर्देश होतो. जसे आदिमानवाने गुहांमधील प्राण्याची चित्रे व शिकारीच्या वेळी केल्या जाणाऱया नाचगाण्यामुळे निर्माण होणारा ध्वनी किंवा शब्द हे एखाद्या प्राण्यासाठीची चिन्हरूपे ठरत. या पार्श्वभूमीवर वस्तूला प्रतीकात्मकता देणे किंवा तिचे चिन्हीकरण करण्यासाठी उपयोगी ठरणारी ‘भाषा’ ही मानवाची अत्यंत आगळीवेगळी अशी आदिम निर्मिती आहे असे म्हणता येईल. खरे तर एखाद्या वस्तूचे चिन्ह म्हणून वापरला जाणारा नादबंध हा काही नेहमीच यादृच्छिक नसतो, तर ती वस्तू आणि त्या नादबंधात बऱयाचदा काही विशिष्ट असे साधर्म्य जाणवल्यामुळेच तो नादबंध त्या त्या वस्तूचे चिन्हरुप धारण करतो.

अशा रीतीने भाषेतील जड-चैतन्याचा, दृश्य-अदृश्याचा वेध घेताना एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे आदिम भाषेतील एकेक शब्द म्हणजे मानवी जाणिवेचा अंतःस्फूर्त असा आकार असतो आणि निखळ प्रकटीकरणापलीकडे त्यात काहीही नसते. बाह्य विश्वाकडून ज्या विविध संवेदना माणसांच्या अनुभवाला येतात, त्या विविध संवेदनांना दिलेला मानस आकार म्हणजे एकेक नवीन शब्द असतो. अशा आकारात इंद्रियसंवेद्यता असते. सभोवतालच्या जड सृष्टीतून वैविध्यपूर्ण अशा संवेदनांचा अखंड मारा माणसांवर होत असतो आणि माणसे मात्र आपल्या चैतन्यशक्तीच्या सामर्थ्यावर त्यांना शब्दांसारख्या माध्यमात पकडून या जड जगाला चैतन्यमय करीत असतात. अशा प्रकारच्या संवेदनांतून निर्माण होणाऱया शब्दरूपांना अपरिहार्यपणे एक विशिष्ट असे भावरूपही प्राप्त होते.

अशा प्रकारे संवेदनांच्या, भावनांच्या विविध रूपांच्या निर्मितीतून आपल्या मनात संवेदनाशय निर्माण होत असतो. त्यासाठी आपल्याला स्वर, शब्द, रंग अशा कोणत्या ना कोणत्या चिन्ह प्रणालीची गरज असते. या अर्थाने पाहिल्यास भाषा ही एकप्रकारची ‘चिन्ह-व्यवस्था’ असते आणि ‘शब्द’ हा तिचा सर्वात लघुत्तम घटक असतो. अर्थात भाषेमधील चिन्ह व चिन्हित यांच्यातील नाते हे यादृच्छिक असते. माणसे आपल्या भावभावना, जीवनजाणिवा या स्वर, रंग, शरीर हालचाली अशा कोणत्या ना कोणत्या चिन्ह स्वरूपांनी आकाराला आलेल्या भाषेतूनच व्यक्त करीत असतात आणि त्यातूनच आपली संस्कृती विकसित होत असते. आपण माणसे आपल्या भवतालाचे चिंतन, मनन आणि आकलन हे सारे भाषेच्या माध्यमातून करीत असतो. त्यामुळे संपूर्ण विश्वाविषयीचे आपले सगळे प्रातिभ आकलन व त्यानुसार आपले एकूणच जगणे हे बरेचसे भाषेने नियत झालेले असते. या अर्थाने पाहिल्यास मानवी संस्कृतीच्या विकसनात भाषेची निर्मिती ही अत्यंत निर्णायक असून कोणतीही संस्कृती ही भाषेशिवाय अस्तित्वातच येऊ शकत नाही.

(लेखिका साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव, कवयित्री, चित्रकार आहेत.)