उमेद – गरजवंतांची संजीवनी ‘धान्य बँक’

>> पराग पोतदार

दुष्काळी स्थितीला तोंड देण्याची एक उपाययोजना म्हणून 1905 साली महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात प्रथम सुरू झालेल्या धान्य बँकांनी आज महाराष्ट्रभर जाळे पसरले आहे. गोरगरीब, गरजू लोक कोणीही उपाशी राहू नये, प्रत्येकाला पोटभर जेवण मिळावे, याच उद्देशाने आज धान्य बँकेची महाराष्ट्रात पाळेमुळे रूजत आहे. या उपक्रमाला हातभार लावण्यासाठी समाजातील सर्वस्तरातील लोक येत आहेत. त्यामुळेच ही धान्य बँक गरजवंतांसाठी संजीवनी ठरत आहे.

भुकेलेल्यांच्या पोटाला अन्न पुरवण्यासाठी वृद्ध, युवक, गृहिणी, शिक्षक आणि लहान मुलेदेखील या चळवळीत सहभागी झाली आहेत. या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध गरजू सामाजिक संस्थांनादेखील मदत करण्यात येत आहे. यासाठी नाशिक माहेर असलेल्या आणि लग्नानंतर ठाण्यात स्थायिक झालेल्या उज्ज्वला बागवडे यांनी पुढाकार घेतला आहे. त्या गरजू संस्था असणाऱया गावांत धान्यबँकेचे केंद्र सुरू करणार आहेत. ‘एक गाव, एक धान्य बँक, दोन संस्था एक सुरुवात’ अशी संकल्पना वुई टुगेदर संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. आतापर्यंत या संस्थेने आपल्या धान्यपेढीतून हजारो किलो धान्य पुरवले आहे.

12 मैत्रिणींपासून सुरू केलेल्या या उपक्रमाशी आता 143 गृहिणी जोडल्या गेल्या आहेत. 50 हजार किलो धान्य देण्याची ताकद आता या संस्थेची असल्याचे बागवाडे यांनी सांगितले. दर महिन्याला ही मंडळी या संस्थेच्या ग्रीन बँकमध्ये आपले पैसे जमा करतात आणि संस्थांना ही मदत धान्य स्वरूपात केली जाते. दर वर्षाला 100 रुपये महिनाप्रमाणे प्रत्येकी 1200 रुपये किंवा त्याहून अधिकही मदत देत असतात.

विविध सामाजिक संस्थांना मदत

बागवाडे यांनी सुरूवातीला बीड जिह्यातील सेवाश्रम, शांतीवन आणि श्रद्धा फाऊंडेशन या संस्था दत्तक घेतल्या. सध्या 19 संस्थांना वुई टुगेदरच्या माध्यमातून धान्य पुरविले जात आहे. त्यापैकी नऊ संस्थांना एक महिनाआड असे वर्षातले सहा महिने धान्य दिले जाते, तर 10 स्थानिक पातळीवरच्या संस्थांचे पालकत्व या संस्थेने घेतले आहे. नऊ संस्थांमध्ये सेवाश्रम, शांतीवन आणि श्रद्धा फाऊंडेशन या संस्थांसह माऊली मोखाडा, माऊली सिंधुदुर्ग, अहिल्यानगर येथील संकल्प संस्था आणि स्नेहप्रेम, पुणे येथील आजवळ, अमरावती येथील संस्था अशा दहा संस्थांमध्ये समतोल, शबरी, सुहीत, घरकुल यांसारख्या संस्थांचा समावेश आहे.

अमरावतीत युवकांची धान्य बँक

अमरावती जिह्यातील पुजदा या पाच हजार लोकसंख्या असलेल्या गावातीलच सामाजिक जाण असलेल्या दात्यांनी आणि सुशिक्षित युवकांनी एकत्र येऊन ग्रामपंचायतीला विश्वासात घेऊन धान्य बँकची निर्मिती केली. साधारण आर्थिक परिस्थिती असणाऱया व्यक्ती या धान्य बँकेत आपल्या इच्छेनुसार गहू, ज्वारी, तांदूळ, बाजरी, तूरडाळ, तेल, भाजीपाला इत्यादी जीवनावश्यक वस्तू दान देतात. या धान्य बँकेत गोळा झालेले धान्य, वस्तू, भाजीपाला इत्यादी, गरजू व्यक्तीना वितरित करण्यात येत आहे.

पुजदा येथील तरुण युवकांनी ‘ग्रामपंचायत सहाय्यता निधी’ नावाने व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला. या माध्यमातून गावातील दानदात्यांकडून जवळपास एक लाख रुपयांच्या वर निधी जमा करून गरजूंच्या दैनंदिन प्राथमिक गरजा भागविण्यासाठी त्यांना पैसेही वाटप करण्यात येते.

शिक्षकांची बीडमध्ये धान्य बँक

संत गाडगेबाबा यांच्या विचाराने प्रवृत्त होत शिक्षकांनी बीड जिह्यात संघर्ष धान्य बँकेची स्थापन केली. गेल्या तीन वर्षांत आत्तापर्यंत तब्बल 700 ते 800 क्विंटल धान्य सात अनाथालय आणि शेकडो गरजवंतांना बँकेमार्फत धान्य वाटप केले आहे. या धान्य बँकेच्या तालुक्यात पाच शाखा आहेत. सात संचालक तसेच गेवराई तालुक्यातील 300 शिक्षक सभासद आहेत. तसेच शेकडो दाते बँकेच्या संपर्कात आले आहेत. दान देण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक असतो. मात्र ते गरजवंतापर्यंत पोहचवण्यासाठी वेळ नसतो, माहिती नसते. यासाठी ही बँक दुवा म्हणून काम करत आहे. अशा बँका ओडिशा, आंध्र प्रदेश, कर्नाटक व प. बंगाल या इतर राज्यातही सुरू झाल्या आहेत.