
>> डॉ. जयश्री जाधव–कदम, [email protected]
लखमापूर गावातील जमनाबाई… शेतीचे वा रुढार्थाने कोणतेच शिक्षण न घेतलेल्या या शेतकरी महिलेने ऊस पीक उत्पादनात चक्क एआयचा वापर केला.
लखमापूर हे नाशिक जिल्हय़ातील कादवा तीरी वसलेले एक औद्योगिक व कृषीदृष्टय़ा दिंडोरी तालुक्यातील विकसित गाव. या गावची मुख्य पिके ऊस, भाजीपाला व द्राक्ष असून कादवा कारखान्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या गावांपैकी सर्वात अधिक ऊस पुरवणारे गाव. गेल्या 50 वर्षांपासून येथे ऊस उत्पादन सुरू आहे, परंतु परंपरागत पद्धतीने शेती करत मिळणाऱया उत्पन्नात आपले गुजराण करत शेतकरी समाधान मानतात. याच गावची एक अशिक्षित शेतकरी महिला जमुनाबाई बाळासाहेब काळे यानी ऊस पीक उत्पादनात एआयचा म्हण्जेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून क्रांती केली आहे.
आज 72 वर्षांच्या जमनाबाई आपल्या शेतीमध्ये एआय तंत्र वापरतात. एआय तंत्र वापरायचे म्हणजे ज्ञान प्राप्त करण्यासाठी शिकण्याची जिद्द, तंत्रज्ञान जाणून घेण्याची जिज्ञासा आणि प्रयत्न त्यासाठी करावा लागणारा खर्च यामध्ये त्या आघाडीवर आहेत. वयाच्या 15 व्या वर्षी लखमापूर येथे शेतकरी कुटुंबात विवाह झाला. या प्रेरणादायी माऊलीला लहानपणापासून शेतीची आवड होती. पूर्णवेळ शेती करत स्वतच्या चार एकर शेतीमध्ये भाजीपाला, द्राक्षबाग, पेरूची बाग, लिंबाची बाग, कोथिंबीर, काकडी, सिमला मिरची अशी अनेक उत्पादने घेतली. आज उसाचे उत्पादन घेत आहेत. वर्षाकाठी पाच ते सात लाख उत्पन्न घेतात. 2010 मध्ये पतीचे निधन झाले तरीही ही माऊली खंबीर नेतृत्वाने शेतामध्ये काम करण्यास उभी राहिली. शेतामध्ये चार मोटारी असून मोटारीचे, पाण्याचे, खताचे, तोडणीचे नियोजन स्वतः करतात. आजपर्यंत नाशिक जिह्यात उसासाठी एआय तंत्रज्ञान वापरणारी ही एकमेव माऊली आहे. म्हणूनच तिची कहाणी प्रेरणादायी आहे. उसाला पाणी देण्याची गरज आहे की नाही, फवारणी कधी करायची ते सर्व मशीनद्वारे मोबाइलवर मेसेज येतो. मशीन सांगते, ड्रोनद्वारे केव्हा फवारणी करायची, कोणते घटक कमी अधिक आहेत?
नवीन तंत्रज्ञान शिकण्याची जिज्ञासा वयाच्या 72 व्या वर्षी या माऊलीला आहे आणि हेच सर्वांसाठी कौतुकास्पद आहे. जमनाबाईंचा प्रवास, शेतीतले यश आणि नवीन तंत्रज्ञानाला घातलेली सांगड खरोखरच सर्व शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे
शेतीत नवनवीन प्रयोग केले. सुधारित बियाणे, माती परीक्षण, मृदेची जलधारण क्षमता, ड्रोनद्वारे फवारणी, तणांचा जैविक बंदोबस्त इत्यादी आधुनिक पद्धतीने ऊस पीक उत्पादनात क्रांती केली. ऊस पिकाला आळशी शेतकऱयाचे पीक समजले जाते. एकदा उसाची लागवड केली की, कोणत्याही प्रकारची काळजी न घेता उत्पादन देणारे पीक म्हणून या पिकाकडे पाहिले जाते, परंतु एआय तंत्रज्ञान, विद्राव्य खतांचा वापर, ठिबक सिंचन व ड्रोनच्या सहाय्याने रोगांवर फवारणी करणे, आवश्यक त्या गोष्टी वापरून या महिलेने अशिक्षित असतानाही ऊस पिकात आमूलाग्र बदल केला. ऊस लागवडीपासून ते ऊस तोडणीपर्यंत सर्व काळजी घेऊन उसाचे विक्रमी उत्पादन केले. त्यासाठी या महिलेने अतोनात परिश्रम घेतले. शेतकरी कुटुंबाचा वारसा असला तरी माती म्हणजे काय? सुपीकता म्हणजे काय? जलधारण क्षमता म्हणजे काय? या गोष्टी तिने स्वत जाणून घेतल्या व त्यानुसार मशागत करण्यास सुरुवात केली. .
मातीतील सूक्ष्म जीव मृत्यू पावू नयेत म्हणून दरवर्षीप्रमाणे पाचट जाळण्याचे जे दुष्कृत्य इतर शेतकरी करत होते ते या महिलेने बंद केले. त्यामुळे मातीची सुपीकता वाढली, भुसभुशीत पणा आला. मोकाट पद्धतीने पाणी न देता ठिबक सिंचनाने मर्यादित स्वरूपात पाणी दिले. अनेक शेतकऱयांचे हे प्रयोग या गावात याआधी फसले होते, परंतु ठिबक सिंचनाची देखभाल करत कोठे पाणी पडते व कोठे पाणी पडत नाही याची काळजी घेतली. अनेक शेतकरी तणांचा बंदोबस्त करण्यासाठी तणनाशकांचा वापर करतात, परंतु तसे न करता माणसांद्वारे जैविकदृष्टय़ा तणांचा बंदोबस्त केला. जोरखते व भरखते देताना नत्र, स्फुरद, पालाश यांची मात्रा उसाच्या गरजेनुसार दिली. तांबेरा नावाचा रोग आल्यानंतर या महिलेने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला व ड्रोनच्या सहाय्याने औषधाची फवारणी केली. अनेक शेतकऱयांचे ऊस पाऊस व वाऱयामुळे आडवे पडले, परंतु या महिलेने शेताची व
दिंडोरी तालुका धरणांचा तालुका म्हणून ओळखला जातो. अनेक लोक मोकाट पद्धतीने जास्त प्रमाणात उसाला पाणी देतात व अनेक लोकांचा असा समज आहे की, उसाला पाणी जास्त लागते, परंतु मोजक्या पाण्यात व आवश्यकतेनुसार पाणी दिल्यास उसाची वाढ योग्य होते हे या महिलेने सिद्ध केले. अशा प्रकारे कोणतेही शिक्षण न घेता जिद्दीच्या जोरावर व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या महिलेने ऊस शेतीत क्रांती घडवून आणली आहे.
(लेखिका के.टी.एच.एम. कॉलेज नाशिक येथे अर्थशास्र प्राध्यापक आहेत.)

























































