आफ्रिकन फलंदाजीवर बुमराचा हल्ला, हिंदुस्थानने पाहुण्यांचा डाव १५९ धावांतच संपवला

गेल्या वर्षी न्यूझीलंडने मायदेशात हिंदुस्थानला दिलेल्या पराभवाचा काटा अजूनही मनात रुतलेला असावा. म्हणूनच की काय, कोलकाता कसोटीच्या पहिल्याच दिवशी हिंदुस्थानी गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेचा डाव १५९वर गुंडाळत गत जखमेचा हिशेब चुकता करायला सुरुवात केली आहे. उद्या मोठी आघाडी घेत विजयाच्या दिशेने झेप घेण्याचे मनसुबे आजच दाखवल्यामुळे इडनवर वेल डन ऐकायला नक्कीच मिळणार.

आपली ५१वी कसोटी खेळणारा जसप्रीत बुमरा आज जणू ‘तपास करायला’च उतरला होता. १६व्यांदा पाच विकेट घेताना त्याने दक्षिण आफ्रिकन फलंदाजांना एकच संदेश दिला. आज इडनवर थांबायला मिळणार नाही आणि त्याने ते दाखवूनही दिले. बुमराचे चेंडू कुणालाच झेपले नाहीत. त्याने मार्करम, रिकल्टन, डी जोर्जी, हार्मर, महाराज या सर्वांना बुमराने एवढ्या वेगाने परत पाठवले की, स्कोअरबोर्डवर धावांपेक्षा विकेटच जास्त दिसत होत्या. कुलदीप यादवची फिरकी, सिराजचा राग, अक्षर पटेलचा अचूकपणा या तिघांनीही बुमराच्या पंचकाला यशस्वी साथ दिल्यामुळे आफ्रिकेचा डाव दीडशेपेक्षा फार पुढे जाऊ शकला नाही.

सुरुवात चांगली; पण बुमराने हादरवले

दक्षिण आफ्रिकेची सुरुवात चांगली झाली. ५७ धावा फलकावरही लावल्या; पण त्यानंतर बुमरा हल्ल्यापुढे आफ्रिकन फलंदाजी उद्ध्वस्त झाली. कुलदीप सिराजने आपली कामगिरी चोख बजावली. मार्करम व रिकल्टनने सुंदर ड्राइव्ह, कट, षटकार खेचत हिंदुस्थानला काहीसा त्रास दिला, पण तो त्रास जास्त काळ टिकला नाही. कारण बुमराच्या आत्मविश्वासापुढे सारे आफ्रिकन वाहून गेले. या सलामीच्या जोडीचे कुलूप बुमरानेच फोडले. कुलदीपने बाबुमा व मुल्डरला गुंडाळले आणि सिराजने तर एका ओव्हरमध्ये दोन विकेट काढून दक्षिण आफ्रिकेचा मधला क्रमच संपवला. जगज्जेता आफ्रिकन संघ इतक्या लवकर ढेपाळेल, याचा कुणी विचारही केला नव्हता. हिंदुस्थानने सुरुवातच इतकी भन्नाट केलीय की फलंदाजांना आता थेट विजयासाठी मोर्चेबांधणी करावी लागणार आहे.

हिंदुस्थानची सावध सुरुवात

हिंदुस्थानने दिवसअखेर १ बाद ३७ अशी धावसंख्या केली असली, तरी ही एक सावध सुरुवात आहे. उद्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पराभवाची जखम भरण्यासाठी दीडशे-दोनशेची आघाडी घेण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. यशस्वी-जैस्वालने डावाच्या सुरुवातीला तीन चौकार मारून जरा रंग दाखवला; पण यान्सनच्या ऑफ स्टंपजवळच्या चेंडूला कट मारताना त्याने स्वतःच स्टम्पला नमन केलं. कट करावा की नाही, या गोंधळात तो ‘कट’ झाला. के. एल. राहुल मात्र दुसऱ्या टोकाला इतका रक्षात्मक होता की कोणी विचारलं असतं, काय भाऊ, पाच-दहा धावा घ्यायचा विचार आहे का? त्याने एक सुंदर कव्हर ड्राइव्ह मारला आणि तो पुन्हा संयमाच्या गुहेत परत गेला. नाईट वॉचमन वॉशिंग्टन सुंदरही सावधच खेळला. कारण उद्या सकाळी मोठी मजल मारायची आहे.