
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार भागीदार असलेल्या अमेडिया कंपनीने नियम धाब्यावर बसवून महार वतनाची जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला. धक्कादायक म्हणजे कोट्यवधी रुपयांचे मुद्रांक शुल्क भरणे अपेक्षित असताना केवळ पाचशे रुपयांची स्टँप ड्युटी भरण्यात आली. याविरोधात भाईंदरमध्ये महाविकास आघाडीने उपनिबंधक कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. राजकीय नेतेमंडळींसाठी एक आणि सर्वसामान्यांसाठी दुसरा न्याय का, असा सवाल उपस्थित करत सरकारच्या भ्रष्ट काराभाराचा धिक्कार केला.
पुणे येथील कोरेगाव पार्क येथे असलेली महार वतनाची जागा पार्थ पवार भागीदार असलेल्या अमेडिया एण्टरप्रायझेस कंपनीने घेतली होती. मात्र हा व्यवहार करताना सुमारे १८०० कोटी रुपये बाजारभाव असलेली ही जमीन केवळ ३०० कोटी रुपयांना विकल्याचा आरोप होत आहे. तसेच सरकारी यंत्रणांचा वापर करून मुद्रांक शुल्काचीदेखील चोरी केल्याचे उघड झाल्याने सरकारवर टीकेची झोड उठली. सत्ताधाऱ्यांच्या या भ्रष्ट कारभाराविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, मनसेच्या कार्यकर्त्यांनी उपनिबंधक कार्यालयावर धडक देत आंदोलन केले.
घोटाळे बंद करा, मुद्रांक शुल्क चोरीचा हिशेब द्या!
आंदोलनादरम्यान पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. घोटाळे बंद करा, मुद्रांक शुल्क चोरीचा हिशेब द्या, आपला तो पार्थ आणि विरोधकांचा स्वार्थ, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, जिल्हा संघटक नीलम ढवण, जिल्हा समन्वयक मनोज मयेकर, उपजिल्हाप्रमुख धनेश पाटील, सदानंद घोसाळकर, सुभाष केसरकर, विधानसभा संघटक हेमलता जोशी, उपजिल्हा संघटक प्राची पाटील, क्षमा गांधी, जयलक्ष्मी सावंत, शहरप्रमुख दीपक नलावडे, संतोष शिंदे, विजय वाळंज, प्रशांत सावंत, राजाराम सावंत, मनीषा भोपळे, कल्पना शिगवण, स्नेहल सावंत, युवासेना जिल्हा अधिकारी दीपेश गावंड, प्रियेश म्हात्रे, श्रेयस हडकर, काँग्रेस जिल्हा अध्यक्ष प्रमोद सामंत, अनिल सावंत, मनसे शहर अध्यक्ष संदीप राणे, वसंत पोपळे आणि सर्व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.




























































