
ज्याच्यासमोर बलाढय़ हत्ती देखील हरला तो महाराजांचा मावळा ‘येसाजी कंक’़, असे त्यांच्याबद्दल बोलले जाते. स्वराज्य का निर्माण करावे ही समज आल्यापासून ते अगदी शेवटच्या श्वासापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांसोबत होते. महाराजांच्या आदेशानुसार स्वराज्याची सेवा करणार्या मावळ्यांमध्ये त्यांचे नाव आवर्जून घ्यायला हवे. स्वराज्यनिर्मितीच्या कार्यात त्यांनी अजोड योगदान दिले. स्वराज्यासाठीच्या प्रत्येक लढाईला त्यांनी धैर्याने तोंड दिले आणि विजय प्राप्त केला. छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकाळात देखील त्यांनी आपले शौर्य स्वराज्यास अर्पण केले होते.येसाजी कंक यांच्याबद्दल अजून एक विशेष गोष्ट म्हणजे ते अतिशय बलदंड शरीराचे होते. कुतुबशाहच्या फौजेतील हत्तीशी येसाजी यांची झालेली झुंज याचे आजही रांगडे वर्णन केले जाते. प्रतापगडाच्या लढाईत त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. भोर येथील राजगडाच्या पायथ्याशी असलेले भुतोंडे हे त्यांचे गाव. मराठा साम्राज्याच्या इतिहासाचे व शौर्याचे प्रतिक असणारे असे त्यांचे स्मारक येथे उभारण्यात आले आहे. येथे त्यांचे शिवकालीन समाधीस्थळ, येसाजी कंक यांच्या राहत्या वाडय़ाचे अवशेष, अश्वस्मारक आणि अस्सल शिवराई नाणे सापडले आहे.

























































