शिक्षणभान – मोफत शिक्षण देणारं फ्युएल स्किल विद्यापीठ

>> मेधा पालकर

एकीकडे वारेमाप फी आकारून शिक्षण देणारी विद्यापीठ आपण पाहतोय तर दुसरीकडे समाजातील गरजू विद्यार्थी शोधून त्यांना मोफत शिक्षण देणाऱ्याची संख्या खूप कमी. त्यापैकी उच्च शिक्षण देणारे फ्युएल स्किल विद्यापीठ. सामाजिक दायित्वातून येणारी देणगी शिक्षणासाठी वापरून फ्युएल स्किल विद्यापीठतून 400 विद्यार्थ्यांनी पदवी घेतली. या विद्यार्थ्यांकडून कोणतेच शुल्क विद्यापीठ घेत नाही. शिक्षणाचा सर्व खर्च सीएसआर अंतर्गत विविध कंपन्यांमधून भागविण्यात येतोय. अशा सामाजिक जाणिवेतून होतकरू विद्यार्थी घडवून, त्यांना स्वत च्या पायावर उभं करणारे या विद्यापीठाचे संचालक डॉ. केतन देशपांडे यांच्याशी साधलेला संवाद.

2007 साली फ्युएल संस्था सुरू झाली. साधारण करियरविषयी फारशी माहिती मिळत नव्हती. ही करियरची माहिती देण्यासाठी मी पुस्तक लिहिलं. ते माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना पाठवलं आणि याच प्रेरणेतून संस्था सुरू झाली. सुरुवातीला करियर मार्गदर्शन, कौशल्य विकास, विद्यार्थ्यांना छोटी कौशल्य शिकवून त्यांना तयार करणे, असे संस्थेचे काम सुरू होते. हळूहळू त्याची व्याप्ती वाढत गेली. त्यातून लक्षात आले, विद्यार्थ्यांना नोकऱ्या हव्या आहेत. कंपनीला असे कौशल्यपूर्ण विद्यार्थी हवे आहेत, ते कोणी देऊ शकत नाही, सीएसआरच्या माध्यमातून निधी उपलब्ध आहे, याचा सुवर्णमध्य साधून आम्ही फ्युएलची सुरुवात केली.

आम्ही मान्यताप्राप्त अभ्यासक्रमाचे शिक्षण त्यांना देतो. विद्यार्थी कोणत्याही विद्यापीठात शिकत असला तरी आपण त्याला शिकवतो. आम्ही कॉर्पोरेटला प्रस्ताव दिला, जवळपास 10 ते 12 मोठय़ा कंपन्या प्रकल्पाशी जोडल्या गेल्या आहेत. आमच्याकडे एमबीए, बीबीए, पीजीडीएम असे पूर्ण अभ्यासक्रम जेएआयसीटी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न आहेत, ते शिकविले जातात. सध्या 450 मुले आमच्या फ्युएल स्किल युनिव्हर्सिटीमध्ये शिकत आहेत. हे सगळे महाराष्ट्र, भारताच्या विविध भागातून आलेले आहेत. 80 ते 85 टक्के मुली आहेत. आम्ही कमवा आणि शिका, योजनेचा फायदा मुलांना देण्यासाठी काही कंपन्यांशी बोलणी केली आहेत. जे होतकरू विद्यार्थी आहेत त्यांना प्रशिक्षण देणार आहोत. साधारण एक हजार विद्यार्थ्यांना विद्यापीठातून प्रशिक्षण देण्याचा मानस देशपांडे यांनी व्यक्त केला.