
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर खांडगाव येथे नाका बंदीदरम्यान संगमनेर शहर पोलीस आणि महसूल विभागाच्या अधिकाऱयांनी एका मोटारीतून दीड ते दोन कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.
पोलीस पथक आणि महसूल विभागाने खांडगाव येथील नाकाबंदीदरम्यान एमएच 25 एएस 8851 या मोटारीतून ही रोकड जप्त केली आहे. यावेळी पथकाने बाबर रज्जाक काजी, अकबर रहमतुला शेख या दोघांना ताब्यात घेतले. सदर रक्कम ही अजमेरा कन्स्ट्रक्शन कंपनीशी संबंधित असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. रोकड आणि जप्त केलेली मोटार पोलिसांनी महसूल विभागाच्या ताब्यात दिली असून, रकमेची मोजदाद सुरू होती. त्यामुळे नेमकी किती रुपयांची रोकड होती याबाबत प्रशासनाने मौन बाळगले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे म्हणाले, ही रोकड कुठून आली? कुठे जात होती? कोणासाठी होती? याची सखोल चौकशी होणार आहे. कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतरच पुढील कारवाई निश्चित केली जाईल. फक्त कॅश सापडल्याने लगेच गुन्हा दाखल होत नाही. महसूल विभाग आणि पोलीस पथकाकडून सुरू असलेल्या नाकाबंदीदरम्यान ही संशयास्पद रक्कम आढळून आली. जिल्हाधिकाऱयांच्या आदेशाने विशेष समिती या प्रकरणाचा तपास करणार आहे. दरम्यान, निवडणुकीचा हंगाम तापलेला असताना ‘कोटय़वधींची कॅश’ पकडली गेल्याची चर्चा वेगाने पसरत आहे.
शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, निरीक्षक समीर बारवकर, महसूलचे अधिकारी अरुण उंडे, तहसीलदार धीरज मांजरे तसेच जिल्हाधिकारी समितीचे पथक घटनास्थळी हजर झाले होते.



























































