
उत्तर प्रदेशमधील सोनभद्र येथे एका दगडाच्या खाणीमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. खाणकाम सुरू असताना दरड कोसळल्याने अनेक मजूर ढिगाऱ्याखाली अडकले असून यापैकी एकाचा मृतदेह हाती लागला आहे. ढिगाऱ्याखाली अद्यापही 15 ते 16 मजूर अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस, एसडीआरएफ आणि एनडीआरएफची पथके घटनास्थळी दाखल झाली असून बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू आहे.
सोनभद्र जिल्ह्यातील बिल्ली मारकुंडी गावात असणाऱ्या खाणीत शनिवारी सायंकाळच्या सुमारास दरड कोसळली. कृष्णा मायनिंग वर्क्स प्रो. दिलीप केसरी आणि मकसुदन सिंग यांच्या मालकीच्या खाणीत ही दुर्घटना झाली असून ढिगाऱ्याखाली 15 ते 16 जण अडकले आहेत. याची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांसह बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली असून आतापर्यंत एका मजुराचा मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती एसपी अभिषेक वर्मा यांनी दिली.
UP: 15 feared trapped, one dead as stone mine collapses in Sonbhadra, rescue ops underway
Read @ANI Story | https://t.co/u2OOpwxRAU#UP #Soanbhadra #StoneMine pic.twitter.com/NPwtnOROI2— ANI Digital (@ani_digital) November 16, 2025
जिल्हाधिकारी बी.एन. सिंह यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, कृष्णा माईन्स खाणीतील एक भिंत अचानक कोसळली. यामुळे खाणीत काम करणारे कामगार ढिगाऱ्याखाली दबले गेले. ही दुर्घटना घडली तेव्हा घटनास्थळी 15-16 कामगार होते. नऊ कॉम्प्रेसर मशीनचा वापर करून खडकाला छिद्रे पाडत असताना हा अपघात झाला.
खाणीची खोली जास्त असल्याने आणि अंधार असल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत. जिल्हा प्रशासनाने बचाव कार्यासाठी पोकलेन आणि जनरेटरचीही व्यवस्था केली असून ढिगाऱ्याखालून मजुरांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. उत्तर प्रदेशचे मंत्री संजीव गोंड हे बचाव कार्यावर लक्ष ठेऊन आहेत. या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.



























































