रविवार ठरला अपघात वार! 24 तासात 4 भीषण अपघातांमध्ये 17 जण ठार; 40 हून अधिक जखमी

देशासाठी रविवार हा अपघात वार ठरला आहे. गेल्या 24 तासांमध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये 4 मोठे अपघात झाले असून यात 17 जणांचा मृत्यू झाला, तर 40 हून अधिक जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मालवाहू ट्रक-टेम्पोत धडक, 6 ठार

राजस्थानमधील जोधपूर-बालेसर मार्गावरील खारी बेरी गावाजवळ पहाटे 5 वाजता भाविकांना घेऊन जाणाऱ्या टेम्पोची आणि धान्याची वाहतूक करणाऱ्या मालवाहू ट्रकची धडक झाली. यात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघांनी रुग्णालयात प्राण सोडले. टेम्पोतील सर्व भाविक गुजरातच्या बनासकांठा आणि धनसुरा जिल्ह्यातील रहिवासी होते. रामदेवराच्या दर्शनासाठी जात असताना हा अपघात झाला.

ग्वालियरमधील अपघातात 5 ठार

मध्य प्रदेशमधील ग्वालियर-झांसी महामार्गावर मालवा कॉलेज जवळ भरधाव कार वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला धडकली. या अपघातात फॉर्च्युनर गाडीचा चेंदामेंदा झाला असून गाडीतील 5 तरुणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

साबरकांठामध्ये 2 ठार, 18 जखमी

गुजरातच्या साबरकांठा जिल्ह्यातील पोशीन तालुक्यात येणाऱ्या चंद्राना गावाजवळ दोन कमांडर जीपची धडक झाली. अपघातानंतर दोन्ही गाड्या रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पडल्या. यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी होता. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारांदरम्यान त्याचाही मृत्यू झाला. या अपघातात 18 जण जखमी झआले असून त्यांना हिम्मतनगर सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जम्मू-कश्मीरमध्ये एकाच कुटुंबातील 4 ठार

जम्मू-कश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात दोन वाहनांच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 10 वर्षीय मुलाचाही समावेश आहे. अपघातात 7 जण जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी एसएमएचएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.