पालघर साधू हत्याकांडातील आरोपी भाजपच्या ‘वॉशिंग मशीन’मध्ये स्वच्छ; आधी प्रवेश दिला, नंतर स्थगित केला

पालघर साधू हत्याकांड प्रकरणी मुख्य आरोपी म्हणून भाजपने ज्या काशिनाथ चौधरी यांच्यावर आरोप केले त्यांनाच ‘वॉशिंग मशीन’मध्ये घालून भाजपने पक्षात घेतले. कमळछाप वाशिंग मशीनने कमाल करत चौधरी यांना स्वच्छ केले आणि त्यांना थेट पक्षात प्रवेश दिला. यामुळे विरोधकांसह नेटकऱ्यांनी भाजपचा खरपूस समाचार घेतला. प्रकरण अंगलट येत असल्याचे पाहताच चौधरी यांच्या पक्षप्रवेशाला स्थगिती देण्यात आली आहे.

महाविकास आघाडीचे सरकार असताना 2020 मध्ये साधू चिन्मयानंद आणि सुधाम महाराज यांची पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे जमावाना हत्या केली होती. मुले चोरणारी टोळी समजून जमावाने त्यांना मारहाण केली होती. तिघांचा मृत्यू झाला होता. या मुद्द्यावरून भाजपने तत्कालिन सरकारवर टीका केली होती. आता याच प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून भाजपने ज्या काशिनाथ चौधरी यांच्यावर आरोप केले त्यांनाच पक्षात प्रवेश दिला. यावरून भाजपच्या ढोंगीपणावर जोरदार टीका होऊ लागली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही यावर प्रतिक्रिया देताना भाजपवर हल्ला चढवला.

पालघर साधू हत्याकांड प्रकरणी मुख्य आरोपी म्हणून भाजपने ज्या काशिनाथ चौधरी यांच्यावर आरोप केले त्यांनाच वॉशिंग मशीनमध्ये घालून भाजपने पक्षात घेतलं. मग पालघर हत्याकांडामागे भाजपच होतं, असं म्हणायचं का? असा सवाल रोहित पवार यांनी केला.

हेच भाजपचं ढोंगी आणि बेगडी हिंदुत्व आहे.. राजकारणासाठी भाजप कोणत्याही थराला जाते हे अनेकदा सिद्ध झालं. कोणत्याही विषयाचं राजकारण करून भाजपकडून सत्तेची पोळी भाजली जाते पण यामुळं सामाजिक संतुलन बिघडून त्याचं मोठं नुकसान राज्याला सहन करावं लागतं, याचातरी भाजपने विचार करावा, असेही रोहित पवार म्हणाले.