
पालघर साधू हत्याकांड प्रकरणी मुख्य आरोपी म्हणून भाजपने ज्या काशिनाथ चौधरी यांच्यावर आरोप केले त्यांनाच ‘वॉशिंग मशीन’मध्ये घालून भाजपने पक्षात घेतले. यावरून शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी भाजपवर हल्ला चढवला.भाजपचे हिंदुत्व बेगडी असल्याची टीका दानवे यांनी केली. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनी शिवतीर्थावरील स्मृतीस्थळावर आदरांजली वाहिल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
दानवे म्हणाले की, पालघर साधू हत्याकांडवर शिवसेना आणि तत्कालिन उद्धव ठाकरे सरकारवर हिंदुत्वाच्या विषयी प्रचंड राळ उठवली होती. साधूंवर हल्ले करणारे आरोपी भाजपमध्ये सहभागी होत आहे. एक तर त्यावेळी भाजपने केलेला आरोप चुकीचा होता किंवा आता ते ज्या पद्धतीने वागताहेत त्या पद्धतीने ते हिंदुत्वाच्या विरोधात असल्याचे चित्र दिसते.
भाजपचे हिंदुत्व बेगडी हिंदुत्व समाजासमोर येत आहे. शिवसेनेचे हिंदुत्व व्यापक आहे. भाजपचे हिंदुत्व स्वार्थाचे आणि मतांच्या राजकारणाचे हिंदुत्व आहे. पालघर प्रकरणातील भाजप क्लिन चीट देऊन पक्षात घेत असेल तर असे हिंदुत्व त्यांना लखलाभ असो, असेही दानवे म्हणाले.
























































