गुरप्रीतचे सुवर्ण हुकले!

हिंदुस्थानचा अनुभवी ऑलिम्पियन नेमबाज गुरप्रीतसिंह हा पुरुषांच्या 25 मीटर सेंटर फायर पिस्टल स्पर्धेत सुवर्णपदकाच्या अगदी उंबरठ्यावर पोहोचला होता, मात्र युक्रेनच्या पावलो कोरोस्टाइलोव याने ‘इनर 10’ म्हणजेच 10 गुणांच्या आत अधिक अचूक निशाणा लगावत विश्वचषक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. थोडक्यात सुवर्णपदकाने हुलकावणी दिल्याने गुरप्रीतला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. ही गुरप्रीतची विश्वचषकातील दुसरी वैयक्तिक पदक विजयाची कामगिरी असून, त्याने 2018 मध्ये चांगवोन येथे 25 मीटर स्टँडर्ड पिस्टलमध्ये रौप्यपदक जिंकले होते.

हिंदुस्थानने तीन सुवर्ण, सहा रौप्य आणि चार कांस्य, अशी एकूण 13 पदके जिंकत चीन व दक्षिण कोरियानंतर तिसरे स्थान मिळवले. चीनने एकूण 21 पदके (12 सुवर्ण, 7 रौप्य, 2 कांस्य) मिळवून अव्वल क्रमांक पटकावला, तर दक्षिण कोरियाने सात सुवर्ण, तीन रौप्य आणि चार कांस्यांसह दुसरे स्थान मिळवले. गुरप्रीतने दोन दिवसांच्या स्पर्धेत प्रिसिजन आणि रॅपिड या दोन्ही टप्प्यांत मिळून 584 गुण नोंदवले, ज्यात 18 इनर-10 शॉट्सचा समावेश होता. कोरोस्टाइलोवने 29 इनर-10 शॉट्स नोंदवले आणि शेवटच्या रॅपिड मालिकेत परफेक्ट 100 गुणांसह सुवर्णपदक मिळवले.

प्रिसिजन टप्प्यानंतर 288 गुण (95, 97, 96) घेऊन गुरप्रीत नवव्या स्थानावर होता. मात्र, दुसऱ्या दिवशी त्याने अप्रतिम पुनरागमन करत रॅपिड टप्प्यात 296 (98, 99, 99) गुणांची कमाल कामगिरी करत रौप्य पटकावले. युक्रेनचा कोरोस्टाइलोव प्रिसिजननंतर 291 गुणांसह अव्वल होता आणि त्याने रॅपिडमध्ये 293 गुण मिळवत गुरप्रीतची बरोबरी साधली; परंतु जास्त इनर-10 शॉट्समुळे विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

हरप्रीत सिंग प्रिसिजन टप्प्यानंतर 291 गुणांसह दुसऱया स्थानी होता; परंतु रॅपिड टप्प्यात फक्त 286 गुणांची कमाई करत तो नवव्या स्थानी घसरला. आणखी एक हिंदुस्थानी नेमबाज साहिल चौधरी 561 गुणांसह (प्रिसिजन-272, रॅपिड-289) 28व्या स्थानावर राहिला. तिघांचा हिंदुस्थानी पुरुष संघ पदक स्पर्धेत पाचव्या स्थानी राहिला.

हिंदुस्थानसाठी सम्राट राणा (10 मीटर एअर पिस्टल) आणि रविंदर सिंग (50 मीटर स्टँडर्ड पिस्टल आणि 10 मीटर एअर पिस्टल टीम) यांनी सुवर्ण जिंकले. ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर (50 मीटर रायफल थ्री पोझिशन), अनिश भानवाला (25 मीटर रॅपिड फायर पिस्टल), गुरप्रीत सिंह (25 मीटर सेंटर फायर पिस्टल), इशा सिंह व सम्राट राणा (10 मीटर एअर पिस्टल मिक्स्ड टीम, 10 मीटर महिला एअर पिस्टल टीम, 50 मीटर पुरुष स्टँडर्ड पिस्टल टीम) यांनी रौप्य मिळवले. इशा (25 मीटर स्पोर्ट्स पिस्टल), इलावेनिल वलारिवान (10 मीटर एअर रायफल), वरुण तोमर (10 मीटर एअर पिस्टल व 10 मीटर महिला एअर रायफल टीम) यांनी कांस्यपदके जिंकली.