
हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी क्रिकेट सामना केवळ तीन दिवसांत संपल्याने आणि ‘टीम इंडिया’चे प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या मागणीनुसारच खेळपट्टी तयार झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सौरभ गांगुलीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पाहुण्या संघाला फिरकीच्या जाळ्यात अडकविण्यासाठी कोलकात्याची खेळपट्टी फिरकीप्रधान बनविली, पण ही ‘रन’नीती हिंदुस्थानी संघाच्याच अंगलट आली. दक्षिण आफ्रिकेने अवघ्या 123 धावांचा यशस्वी बचाव करताना 30 धावांनी विजय मिळवला.
पहिला कसोटी सामना तीन दिवसांत संपल्याने आणि पिचवर गोलंदाजांना मिळालेल्या अतिउत्स्फूर्त मदतीमुळे क्रिकेटविश्वात मोठे वादंग उसळले, मात्र हिंदुस्थानचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी खेळपट्टीवर दोष ठेवण्यास नकार दिला आणि ‘ही विकेट जशी आम्ही मागितली तशीच होती’ असे सांगितले. मात्र, ‘टीम इंडिया’चा माजी कर्णधार आणि क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचा अध्यक्ष सौरभ गांगुलीने गंभीरला आपला हा दृष्टिकोन बदलण्याचा सल्ला दिला आहे.
कसोटी पाच दिवसांत जिंकायला हवी!
‘टीम इंडिया’चे प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी विणलेल्या फिरकीच्या जाळय़ात दक्षिण आफ्रिकेऐवजी हिंदुस्थानी संघाचीच शिकार झाली. खरंतर 123 धावांचे लक्ष्य गाठणे नक्कीच कठीण नव्हते, असे सांगत गांगुली म्हणाला की, गंभीर आणि व्यवस्थापनाने स्वतःच क्युरेटरशी चर्चा करून अशी फिरकीपट्टी तयार करण्यास सांगितले होते. तरीही हिंदुस्थानी संघाने चांगल्या विकेट्सवर खेळायलाच हवे. प्रशिक्षक या नात्याने गंभीरने काही गोष्टी बदलण्याची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. विशेष म्हणजे जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी यांसारख्या मॅच विनर वेगवान गोलंदाजांवर विश्वास ठेवण्याची गरज आहे. शिवाय हिंदुस्थानला मायदेशात सातत्याने कसोटी सामने जिंकून देणाऱ्या फिरकी गोलंदाजीवरही भरवसा ठेवायला हवा. कसोटी सामने हे पाच दिवसांत जिंकायला हवेत, तीन दिवसांत नाही,’ अशा शब्दांतही सौरभ गांगुलीने गौतम गंभीरचे कान टोचले.



























































