
कर्नाटकात सिद्धरामय्या सरकारला अडीच वर्ष पूर्ण होत असून पुन्हा एकदा नेतृत्व बदलाच्या चर्चांना उधाण आले आहे. नोव्हेंबरमध्ये मुख्यमंत्री बदलणार असल्याची अटकळ बांधली जात आहे. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे नाव यात आघाडीवर आहे. नुकतीच त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचीही भेट घेतली. तर मुख्यमंत्री सिद्धरामय्याही यावेळी दिल्लीतच होते. या घडामोडीनंतर नेतृत्व बदलाच्या चर्चांना अधिक फोडणी मिळाली. यावर आता डी. के. शिवकुमार यांनीच भाष्य केले आहे.
पक्ष आहे, तर आम्ही आहोत! राजीनाम्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करणार नाही, असे ते माध्यमांशी बोलताना म्हणाले. तसेच राज्याच्या नेतृत्व बदलाचा प्रश्न ज्योतिषाला विचारायला जा, असेही ते म्हणाले. मी पक्षाचा शिस्तबद्ध सैनिक असून पक्षाची सेवा करण्यास समर्पित आहे. मला जी जबाबदारी सोपवण्या आली आहे, ती मी पूर्ण करतो, असेही ते म्हणाले.
कर्नाटकमध्ये लवकरच मंत्रिमंडळाचाही विस्तार होणार असून अनेक काँग्रेस आमदारांनी मंत्रिमंडळात समावेशाची इच्छा व्यक्त केली आहे. याबाबत विचारले असता ते म्हणाले, आमदार आणि विधान परिषदेच्या सदस्यांनी अपेक्षा ठेवण्यात काय गैर आहे? कुणाला मंत्री करायचे हा अधिकार मुख्यमंत्र्यांकडे आहे. पक्षासाठी मेहनत घेणाऱ्या महत्त्वाकांक्षा असणार. आपण त्याला चूक कसे म्हणू शकतो? पक्षासाठी ज्यांनी संघर्ष केला, बलिदान दिले आणि कष्ट घेतले त्यांनी अपेक्षा ठेवण्यात गैर काय? असा सवालही शिवकुमार यांनी केला.
दरम्यान, डी. के. शिवकुमार प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार अशीही चर्चा सुरू होती. यावरही त्यांनी भाष्य केले. मी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी वेळ आलेली नाही. मी काँग्रेसला ब्लॅकमेल करणार नाही. मी हा पक्ष उभा केला असून दिवस-रात्र काम केले आहे. पुढेही मी पक्षासाठी काम करत राहील. 2028 मध्ये काँग्रेसचीच सत्ता येईल, असेही ते ठामपणे म्हणाले.































































