
सोशल मीडियावरून गोव्यातील पर्यटन आतापर्यंतच्या सर्वात कमी पातळीवर असल्याचे दिसून येते. परंतु असे असले तरीही एकूणच प्रवाशांच्या डेटावर नजर टाकल्यास हा आलेख चढा दिसत आहे. गतवर्षीच्या तुलनेत गोव्यातील एकूण पर्यटनामध्ये 6.23 टक्के वाढ झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून, सोशल मीडियावर गोव्याचे पर्यटन पूर्वीइतके लोकप्रिय नसल्याचे म्हटले जात होते. परंतु यामागील आलेख मात्र वेगळेच चित्र स्पष्ट करत आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, जानेवारी ते सप्टेंबर २०२५ दरम्यान गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत गोव्यात एकूण पर्यटन वाढ 6.23 टक्के झालेली आहे. देशांतर्गत आवक ५.३६ टक्क्यांनी वाढली आहे. २०२४ मध्ये ६९,२४,९३८ वरून २०२५ मध्ये ७२,९६,०६८ झालेली आहे. आंतरराष्ट्रीय आवकांमध्ये २९.३३ टक्क्यांनी वाढ झाली, जी २,५९,८२० वरून ३,३६,०३१ पर्यंत वाढली.
२०२४ मध्ये गोव्यात एकूण १,०४,०९,१९६ पर्यटक आले होते, जे २०२३ मध्ये ८६,२८,१६२ होते. या वाढीमध्ये २०२३ मध्ये ८१,७५,४६० वरून २०२४ मध्ये ९९,४१,२८५ पर्यंत वाढणारे देशांतर्गत आगमन समाविष्ट आहे. याच कालावधीत परदेशी पर्यटकांची संख्या ४,५२,७०२ वरून ४,६७,९११ पर्यंत वाढली.
पर्यटन हा गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा एक प्रमुख आधारस्तंभ असून, राज्याच्या जीडीपीमध्ये अंदाजे १६.४३ टक्के योगदान देतो. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती ही ४५ टक्के पर्यंत आहे. राज्य सरकारच्या मते, या वाढीमागील सर्वात मोठे कारण म्हणजे सरकारने रशिया आणि मध्य आशियासारख्या ‘उच्च-क्षमतेच्या बाजारपेठांमध्ये’ निर्णायक पाऊल टाकले आहे.
नवीन विमानसेवेमुळे आता गोवा हे राज्य रशियाच्या एकातेरिनबर्ग, नोवोसिबिर्स्क आणि मॉस्कोशी आणि कझाकस्तानशी जोडले गेले आहे. नॉर्वे, डेन्मार्क, स्वीडन आणि फिनलंडसारख्या उदयोन्मुख बाजारपेठांमध्येही आता गोव्याची चर्चा होऊ लागली आहे. यामुळेच येणाऱ्या पर्यटनासाठी नवीन कॉरिडॉर उघडले जात आहेत. यामुळेच गोवा हे कायम आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठी योग्य ठिकाण म्हणून पाहिले जाते. त्यामुळेच परदेशी पर्यटकांची गर्दी ही कायम वर्षभर गोव्यात पाहायला मिळतात.





























































