मोखाड्याजवळ एसटीला अपघात; 25 जखमी, श्रीघाटातील अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटला

जव्हारमध्ये एसटीचा भीषण अपघात होऊन ४० जण जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच आज सकाळी पुन्हा श्रीघाटात असाच भयंकर अपघात घडला. पालघरहून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने भरधाव निघालेल्या एसटीचालकाचा अवघड वळणावर ताबा सुटला आणि बस रस्त्याच्या कडेला कलंडली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी २५ प्रवासी जखमी झाले आहेत. यातील तीन प्रवासी गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पालघर आगारातून सकाळी सात वाजता पालघर-वाडा-छत्रपती संभाजीनगर बस नाशिककडे जात होती. ३८ प्रवासी या बसमधून प्रवास करीत होते. पालघरची हद्द संपताच अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या देवगाव फाट्याजवळ बस घाट चढत असताना अवघड वळणावर चालक मधुकर चव्हाण यांचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे एसटी रस्त्याच्या कडेला कलंडली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट उडाली. बसमधील प्रवासी जीवाच्या आकांताने ओरडू लागले. अपघाताचे वृत्त समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत प्रवाशांना बाहेर काढले. रस्त्याची चाळण झाल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

मोबाईलने घात केला

बसचा अपघात इतका भीषण होता की, प्रवासी शिवराम झुगरे यांच्या नाकातोंडाला मार लागला. तर चंद्रकांत शिद यांच्या पाठीला आणि साहेबनूरबी खान यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. दोन गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र चालक बस चालवताना मोबाईल वर बोलत असल्यामुळे अपघात झाल्याचे प्रवाशांनी सांगितले.

श्रीघाट ते देवगाव या तीन किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्याची चाळण झाली आहे. त्यामुळे खड्डे चुकवताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते.