निवडकर्ते गोंधळलेले, संघ निवडीमध्ये स्पष्टतेचा अभाव! दिग्गज खेळाडूने गंभीर, आगरकरची पिसं काढली

कोलकाता येथे झालेल्या पहिल्या कसोटीमध्ये हिंदुस्थानला पाहुण्या दक्षिण आफ्रिकेकडून लाजिरवणा पराभव स्वीकारावा लागला. या कसोटीसाठी फिरकीला साथ देणारी खेळपट्टी बनवण्यात आली. मात्र या फिरकीत हिंदुस्थानचा संघच अडकला आणि आफ्रिकेने 30 धावांनी विजय मिळवला. या कसोटीनंतर निवडकर्ते आणि संघ व्यवस्थापनावर टीकेची झोड उठली आहे. हिंदुस्थानचे माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद यांनीही मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांच्यावर निशाणा साधला.

कोलकाता कसोटीतील पहिल्या दोन दिवसावर हिंदुस्थानचे वर्चस्व होते. मात्र तिसऱ्या दिवशी हिंदुस्थानचा संघ 124 धावांचा पाठलाग करताना 93 धावांमध्ये बाद झाला आणि हिंदुस्थानचा पराभव झाला. घरच्या मैदानावर याआधी हिंदुस्थानला न्यूझीलंडने व्हाईट वॉश दिला होता. त्यानंतर आता आफ्रिकेने 15 वर्षानंतर हिंदुस्थानमध्ये कसोटी जिंकली. याला निवडकर्ते जबाबदार असल्याचे व्यंकटेश प्रसाद यांनी म्हटले. तसेच गंभीरने प्रशिक्षकपदाचा पदभार स्वीकारल्यापासून कसोटी क्रिकेटमध्ये संघाच्या खराब कामगिरीवरही त्यांनी प्रकाश टाकला.

काय म्हणाले व्यंकटेश प्रसाद?

व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये (वन डे आणि टी-20) आपली कामगिरी उत्कृष्ट असली तरी असे नियोजन राहिले तर आपण स्वत:ला सर्वोत्तम कसोटी संघ म्हणू शकत नाही. निवडकर्त्यांकडे स्पष्ट दृष्टीकोन नाही आणि अतिरेकी धोरणात्मक विचारसरणी उलटी ठरत आहे. इंग्लंडविरुद्धच्या अनिर्णित मालिकेचा अपवाद वगळता यंदा कसोटीतील निकाल निराशाजनक राहिले आहेत, असे व्यंकटेश प्रसाद म्हणाले.