
रस्ता बांधकामाच्या भूमिपूजनासाठी आलेल्या चंद्रपूरचे भाजपचे आमदार किशोर जोरगेवार यांना लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. दलित वस्ती सुधारणा योजनांतर्गत येथील बायपासलगत रस्त्याचे भूमिपूजन आयोजित होते. यासाठी पालकमंत्री आणि सर्व आमदारांना निमंत्रण देणे अपेक्षित होते. पण तसे काही झाले नाही. केवळ त्यांच्या नावाचा फलक लावण्यात आला आणि आमदार जोरगेवार एकटेच आपल्या कार्यकर्त्यांसह भूमिपूजनासाठी पोचले. ही बाब काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेश अडूर यांच्या लक्षात आल्यावर तेही घटनास्थळी कार्यकर्त्यांसह दाखल झाले.
आमदार किशोर जोरगेवार पोहोचताच त्यांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध करीत भूमिपूजनापासून रोखण्याचा प्रयत्न केला. यात दोन्ही गटात शाब्दिक बाचाबाची झाली. गोळा झालेल्या लोकांनीही विरोध सुरू केला. दोनशे युनिटचा प्रश्न उपस्थित करताच आमदार जोरगेवार भडकले. गोंधळ वाढत असल्याचे दिसताच आमदार जोरगेवार यांनी घाईघाईने कुदळ मारली आणि परत निघाले. यावेळी दोन्ही गटात धक्काबुक्की झाली. याची झळ आमदारांना पोचली. प्रकरण वाढण्यापूर्वीच पोलिसांनी वेळीच पोहचून परिस्थिती शांत करीत आमदारांना बाहेर काढले. ज्या रस्त्याचे भूमिजन आमदार करायला आले, त्या रस्त्याची मंजुरी आघाडी सरकारच्या काळात मिळाली आणि त्याचे सत्तर टक्के पूर्ण झाले. मग आता नव्याने त्याच रस्त्याचे भूमिपूजन कशाला, असा सवाल काँग्रेसने उपस्थत केला.



























































