
देशाच्या बऱ्याच भागात थंडीची लाट पसरली आहे, ज्यामुळे नोव्हेंबरचा पहिला भाग पूर्णपणे हिवाळ्याच्या प्रारंभासारखा वाटत आहे. भारतीय हवामान खात्याच्या (IMD) मते, या महिन्यात किमान तापमान जवळजवळ दररोज सामान्यपेक्षा कमी राहिले आहे. संपूर्ण हिंदुस्थानात अनेक प्रदेशांमध्ये किमान तापमान सामान्यपेक्षा २° ते ६° सेल्सिअस कमी होते. पुढील पाच दिवसांत किमान तापमान सामान्यपेक्षा कमी आणि सामान्य दरम्यान राहील असे आयएमडीने म्हटले आहे.
दिल्लीमध्ये हिवाळ्याच्या सुरुवातीलाच हुडहुडी भरल्यासारखी थंडी सुरु झाली आहे. अतिशय खराब हवेच्या गुणवत्तेचा सामना करत असताना, राजधानीने ११ वर्षांतील सर्वात पहिले एक अंकी किमान तापमान नोंदवले. १५ नोव्हेंबरपासून, किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली राहिले आहे.
सोमवारी दिल्लीत किमान तापमान ८.७ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे सामान्यपेक्षा ३.६ अंश कमी होते आणि नोव्हेंबरमधील तीन वर्षातील सर्वात कमी तापमान होते. शहरातील रात्रीचे तापमान ९ अंश सेल्सिअस ते ११ अंश सेल्सिअस दरम्यान होते, तर कमाल तापमान २४ अंश सेल्सिअस ते २६ अंश सेल्सिअस दरम्यान होते.
गेल्या २४ तासांत तापमानात सुमारे १ अंश सेल्सिअसची किंचित वाढ झाली असली तरी, अनेक ठिकाणी तापमान “सामान्यपेक्षा लक्षणीयरीत्या कमी” राहिले आहे.
शहरात पाऊस पडल्यानंतर तापमानाचा पारा आणखी खाली येण्याची शक्यता आहे, जो येत्या काही दिवसांत होण्याची शक्यता आहे, असे स्कायमेटचे महेश पलावत यांनी वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले.
थंडीचा हा कडाका केवळ उत्तरेपुरता मर्यादित नाही. मंगळवारी मुंबईतही कमी तापमान नोंदवले गेले असून, सांताक्रूझ वेधशाळेने १७.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले. नोव्हेंबरच्या मध्यात सामान्य तापमानापेक्षा ३.८ अंश सेल्सिअस कमी होते आणि सोमवारच्या १७.८ अंश सेल्सिअसपेक्षा कमी होते.
मंगळवारी मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम मध्य प्रदेशातील काही भागात थंडीची लाट ते तीव्र थंडीची लाट आली आहे. उद्यापर्यंत काही ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम मध्य प्रदेश तसेच सौराष्ट्र आणि कच्छ, विदर्भ, तेलंगणा, झारखंड, छत्तीसगड आणि ओडिशातील काही ठिकाणी किमान तापमान सामान्यपेक्षा पाच अंशांनी कमी होते.
आजपासून २१ नोव्हेंबरपर्यंत पश्चिम बंगालच्या सर्व जिल्ह्यांमध्ये मध्यम धुके पसरेल अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान दक्षिणेकडील काही भागांमध्ये पावसाच्या शक्यताही वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याने २४ नोव्हेंबरपर्यंत तामिळनाडूमध्ये आणि शनिवारपर्यंत अंदमान आणि निकोबार बेटांवर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.




























































