
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 6 डिसेंबर या महापरिनिर्वाणदिनी राज्य सरकारने मुंबईसाठी स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे. सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी याबाबतचा शासन निर्णय जारी केला. या निर्णयानुसार 6 डिसेंबर 2025 रोजी मुंबई शहर आणि उपनगर जिह्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालये बंद राहतील.
पोलिसांनी नोंदवला रोहित आर्यच्या पत्नीचा जबाब
बहुचर्चित पवई ओलीस नाटय़ प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रोहित आर्यच्या पत्नीचा जबाब नोंदवला. रोहित आर्यच्या पत्नीचा जबाब नोंदवण्यासाठी पोलिसांचे पथक पुण्याला गेले होते. पोलिसांनी रोहितची पत्नी अंजलीची चार तास चौकशी केल्याचे समजते. लेखक-दिग्दर्शक असलेल्या रोहित आर्यने लेट्स चेंज पर्व चारच्या नावाखाली 17 मुलांचे ऑडिशन घेतले होते. गेल्या महिन्यात रोहितने त्या मुलांना रॉ स्टुडिओमध्ये बोलवून ओलीस ठेवले होते.
ड्रग्ज तस्कराला 15 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा
कोडेन फॉस्फेट मिश्रित कप सिरपच्या हजारो बाटल्या बाळगल्या प्रकरणात अमली पदार्थ विरोधी कक्षाने रंगेहाथ पकडलेल्या एका आरोपीला विशेष सत्र न्यायालयाने दणका दिला. त्या आरोपीविरोधात पोलिसांनी सादर केलेल्या सबळ पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने त्याला 15 वर्षे सक्तमजुरी व एक लाख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
2020 मध्ये अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या घाटकोपर युनिटने चेंबूरमध्ये फुटपाथवर शाकीर हुसेन मोहम्मद रेतीवाला (55) याला पकडले होते.




























































