
हार्बर रेल्वेच्या वडाळा स्थानकाजवळ बुधवारी दुपारी तांत्रिक बिघाड झाल्याने या मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत झाली. जवळपास अर्धा तास डाऊन मार्गावर वांद्रेच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे लोकल ट्रेनच्या रांगा लागल्या. मंगळवारी मध्य रेल्वेवर विक्रोळी स्थानकाजवळ रुळाला तडा गेला होता. त्यापाठोपाठ हार्बरची सेवा कोलमडल्याने प्रवाशांचे हाल झाले.
वडाळा रेल्वे स्थानकाजवळ दुपारी 2च्या सुमारास पॉईंटमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्याची माहिती रेल्वेच्या संबंधित विभागाला देण्यात आल्यानंतर दुरुस्तीकाम हाती घेण्यात आले. मात्र बिघाड दुरुस्त करण्यात अर्धा तास लागला. तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून (सीएसएमटी) वांद्रे, अंधेरी, गोरेगावच्या दिशेने जाणारी लोकल वाहतूक ठप्प झाली. नंतर 2 वाजून 40 मिनिटांनी लोकल सेवा सुरू करण्यात आली. मात्र सेवा पूर्वपदावर येण्यास वेळ लागल्याने सायंकाळी चार वाजेपर्यंत हार्बरचे वेळापत्रक विस्कळीतच होते. त्याचा मोठा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागला. अनेक प्रवाशांनी लोकलचा प्रवास अर्ध्यावर सोडून बेस्ट बसेस तसेच टॅक्सीने पुढील प्रवास सुरू केला. सायंकाळी कामावरून घरी परतणाऱ्या नोकरदार मंडळींचीही हार्बरच्या प्रवासात रखडपट्टी झाली. रेल्वेचा तांत्रिक बिघाड वेळीच दुरुस्त करणारी यंत्रणा उपलब्ध नसते. त्यामुळे बराच वेळ लोकलचे वेळापत्रक कोलमडते. रेल्वे प्रशासन इतर कामांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करते. मग देखभाल-दुरुस्तीच्या यंत्रणांच्या विकासाकडे गांभीर्याने लक्ष का देत नाही, असा संतप्त सवाल अनेक प्रवाशांनी केला. याबाबतीत पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या तुलनेत हार्बर रेल्वेकडे अधिक दुर्लक्ष होत असल्याची नाराजी नियमित प्रवाशांनी व्यक्त केली.




























































