
ज्येष्ठ संघाप्रमाणेच अफगाणिस्तानचा ज्युनिअर संघही दमदार प्रदर्शन करत आहे. 19 वर्षांखालील तिरंगी मालिकेत त्यांनी आपली ताकद सिद्ध करत हिंदुस्थान ब संघावर 71 धावांनी दणदणीत विजय मिळवला. अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 45.2 षटकांत 168 धावा केल्या होत्या तर अफगाणी अब्दुल अझीझने 36 धावांत 6 विकेट घेत हिंदुस्थानी ब संघाला शंभरीही गाठू दिली नाही. हिंदुस्थानचा ब संघ 97 धावांवर आटोपला आणि अफगाणिस्तानने 71 धावांचा मोठा विजय मिळवला.
अफगाणिस्तानने फैझल शिनोझदा (58) आणि अझीझुल्लाह मियाखिल (42) यांनी पाचव्या विकेटसाठी 48 धावांची भागी रचत संघाला शतकी टप्पा गाठून दिला. त्यानंतर अझीझुल्लाहने शेवटपर्यंत किल्ला लढवत संघाला 168 धावांपर्यंत नेले. नमन पुष्पकने 4 विकेट घेत अफगाणिस्तानचा डावाला लवकर गुंडाळले. त्यानंतर 169 धावांचा पाठलाग करताना युवराज गोहिलच्या (ना. 60) एकाकी झुंजीने हिंदुस्थानचा पराभव टाळण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला. युवराजचा अपवाद वगळता हिंदुस्थानच्या उर्वरित दहाही फलंदाजांना दोनअंकी धावसंख्या उभारता आली नाही. अब्दुल अझीझने सामन्यात दोनदा एका षटकात दोन विकेट टिपण्याची करामत केली. या सामन्यात तोच विजयाचा शिल्पकार ठरला.





























































