ग्रामीण रुग्णालय, आरोग्य केंद्रांतील आठ वैद्यकीय अधिकाऱ्यांना नोटिसा, सांगलीतील ग्रामीण रुणालयांची उपसंचालकांच्या पथकाकडून तपासणी

सांगली जिह्यातील ग्रामीण रुग्णालय आष्टा, विटा, जत, कोकरुड, म्हैसाळ, डफळापूर, कासेगाव, खेराड- वांगी आरोग्य केंद्रांची अचानक तपासणी करण्यात आली. तपासणीत रुग्णालयात गंभीर त्रुटी आढळल्या आहेत. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांसह वैद्यकीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. विभागीय आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने यांनी कारवाई केली.

शासकीय रुग्णालयांची स्थिती सुधारण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे आदेश आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर शासकीय रुग्णालयांच्या कामकाजात निष्काळजीपणा करणाऱ्यांवर आरोग्य विभागाने कडक कारवाईचा बडगा उगारला आहे.

जिल्हा ग्रामीण रुग्णालय आष्टा, विटा, जत, कोकरुड, म्हैशाळ, डफळापूर, कासेगाव, खेराड वांगी आरोग्य केंद्रांची पाहणी करण्यात आली. या रुग्णालयांमध्ये त्रुटी आढळल्याने कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या तपासणीत स्वच्छता, जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन, औषधसाठा, उपकरणे, प्रसुतिगृह आणि शस्त्रक्रिया कक्षातील सुरक्षाविषयक बाबींकडे दुर्लक्ष झाल्याचे निदर्शनास आले. काही रुग्णालयांत व्यवस्था नसल्याने वापरलेले कपडे तसेच पडून होते. हे रुग्णाच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. अस्वच्छता, जैववैद्यकीय कचऱ्याचे व्यवस्थापन, तसेच मुदतबाह्य औषधसाठा यासह प्रसूतीचे कमी प्रमाण आदी गंभीर बाबी दिसून आल्या.

दरम्यान, नोटीस बजावण्यात आलेल्यांकडून खुलासा मागविण्यात आला असून, त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे आरोग्य उपसंचालक डॉ. माने यांनी सांगितले.