
‘हवा झाली बेइमान जरी, तरी मशाल विझत नसते
ही बाळासाहेबांची शिवसेना हाय, ती कधी म्हातारी होत नसते…’
प्रत्येक कडवट, निष्ठावंत शिवसैनिकांच्या मनातील या भावना आहेत. या भावना गुरुवारी कवितेच्या रुपाने सादर झाल्या आणि सारेच स्तब्ध झाले. प्रत्येक शब्दाने शिवसैनिकांच्या काळजाला हात घातला, उपस्थितांच्या डोळ्यांतून पाणी आलं. सोशल मीडियावर परेश दाभोळकर यांची शिवसेनेवरील कविता तुफान व्हायरल होत आहे.
शिवसेना भवन येथील ज्येष्ठ शिवसैनिक कक्षाचा वर्धापन दिन सोहळा गुरुवारी झाला. या वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत निष्ठावंत, ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान करण्यात आला. या सोहळ्यात ‘ही बाळासाहेबांची शिवसेना हाय’ या कवितेने साऱयांच्या मनाचा ठाव घेतला. मराठवाडय़ातील शेताच्या बांधावरून आलेला शेतकरी आपले मन मोकळे करतो. शिवसेनेबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त करतो, असे कवितेचे सादरीकरण करण्यात आले. परेश दाभोळकर यांनी ही शेतकऱयाच्या वेशभूषेत भावनिक कविता सादर केली. यातून गोरगरीब, कष्टकरी, शोषित, वंचितांना न्याय देणारी शिवसेनेची भूमिका शब्दबद्ध केली. शिवसेनेची ही दमदार वाटचाल कवितेतून अधोरेखित करण्यात आली. याला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. ही बाळासाहेबांची शिवसेना हाय, ती कधी म्हातारी होत नसते… असा जयघोष झाला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कवितेला मनापासून दाद दिली.
हवा झाली बेइमान जरी तरी मशाल विझत नसते
ही बाळासाहेबांची शिवसेना हाय ती कधी म्हातारी होत नसते
ती मोरारजीच्या सुसाट गाडीसमोर झोपते
80 टक्के मराठी तरुणांना नोकरी मिळावी म्हणून नडते
बेळगाव निपाणी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी लढते
ती फक्त सरदाराला नाही मामुली कार्यकर्त्याला नेता करते
जो राबला संघटन वाढीसाठी त्या डोईवर मायेचं छत्र धरते
विजयाचा गुलाल लावून ती दगडाची रेख करते
बाळासाहेबांच्या आठवणीनं डोळ्यात पाणी भरते
पक्षवाढीसाठी ती दिवसाची रात्र करते
वय विसरून उद्धवजींच्या मागे उभी असते
पुराचं पाणी ओसरून गेल्यावर, ती पहिली मदतीला पोहोचते
तुटली घरं मोडलेले संसार ती पुन्हा उभी करते
एक म्हातारी वाचावी म्हणून गळाभर पुराच्या पाण्यातही शिरते
उद्धवजी मुख्यमंत्री होणार म्हणून हसत राजीनामा देते
निडर होऊन प्रस्थापित उन्मत सत्तेला सवाल करते
रुग्णाचे अश्रू पुसायला जनता दरबार घेते
हॉस्पिटलच्या बेडवर असली तरी थरथरत्या हाती रोखठोकच लिहिते
दसऱ्या दिवशी ही महाराष्ट्रभरातून मुंबईला कूच करते
फूड पॅकेटवर नाही घरच्या चटणी भाकरी वडापाववर पोसते
विचारांचं सोनं लुटायला शिवतीर्थावर गुडघाभर चिखलात उभी असते
ही बाळासाहेबांची शिवसेना हाय ती कधी म्हातारी होत नसते
































































