डोंबिवली, ठाण्यातील सरकत्या जिन्यांना ‘धाप’, एस्कलेटर वारंवार बंद; वृद्ध, दिव्यांग, गर्भवती महिलांची फरफट

घडाळ्याच्या काट्यावर धावणाऱ्याा चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी ठाणे, डोंबिवली रेल्वे स्थानकात सरकते जिने बसवण्यात आले आहेत. मात्र या एस्कलेटरला सध्या ‘धाप’ लागत आहे. हे सरकते जिने वारंवार बंद पडत असल्यामुळे दिव्यांग, वृद्ध, गर्भवती महिलांची फरफट होत आहे. सकाळी कामावर जाण्याची गडबड, त्यात सरकते जिने बंद असल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो.

ठाणे आणि डोंबिवली या स्थानकावरून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांच्या सोयीसाठी या दोन्ही स्थानकांवर लाखो रुपये खर्चुन सुमारे १० सरकते जिने बसवले आहेत. मात्र रेल्वे प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे हे सरकते जिने सतत बंद पडत असल्यामुळे प्रवाशांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. डोंबिवली स्थानकातील फलाट क्रमांक तीन आणि चार तसेच ठाणे स्थानकातील १० ए वरील सरकता जिना वारंवार बंद असतो. त्यामुळे प्रवाशांना जिने चढून एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर जावे लागत आहे. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही रेल्वे प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.

मोठी दुर्घटना घडली तर जबाबदार कोण?

सेन्सरमध्ये येणारा तांत्रिक बिघाड, सरकत्या जिन्याच्या बाजूला असलेले बटण दाबणे, वस्तू अडकणे, अतिभार सहन न होणे अशा वेगवेगळ्या कारणांमुळे महिन्यातून अनेकदा रेल्वे स्थानक परिसरातील सरकते जिने बंद पडतात. अचानक बंद पडलेल्या एस्कलेटरमुळे जिन्यांवरील गर्दीत भर पडते. यामुळे चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण होते. या ठिकाणी एखादी दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण, असा सवाल प्रवाशांनी केला आहे.