
कुळगाव बदलापूरमधील बेकायदेशीर बांधकामांची दखल घेत न्यायालयाने सुधारणा समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. बदलापूरच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट सादर करा, तसेच न्यायालयाच्या आदेशांकडे दुर्लक्ष करू नका, असे बजावत न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांच्या खंडपीठाने या याचिकेवरील सुनावणी दोन आठवड्यांसाठी तहकूब केली.
बदलापूर येथे ए प्लस लाईफ स्पेसेस या विकासकाकडून बांधकाम करण्यात आले असून सोसायटीचे सांडपाणी त्रिशूल गोल्डन विले गृहनिर्माण सोसायटीच्या आवारात वाहून आल्याने यशवंत भोईर यांनी याप्रकरणी हायकोर्टात अॅड. अविनाश फटांगरे आणि अॅड. अर्चना शेलार यांच्या मार्फत याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.
खंडपीठाने गेल्या सुनावणीवेळी शहरातील अनधिकृत बांधकामांबाबत माहिती सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या वतीने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. न्यायालयाने बदलापूरमधील पायाभूत सुविधेबरोबरच सांडपाण्याचा निचरा योग्य पद्धतीने करावा, सांडपाणी उल्हास नदीत सोडून नदी प्रदूषित करू नये असे स्पष्ट करतानाच अवैध बांधकामांना प्रतिबंध करावा, त्यासाठी पावले उचलावीत, असे आदेश प्रशासनाला दिले.
438 बांधकामे अनधिकृत
कुळगाव बदलापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले असून कुळगाव बदलापूरच्या हद्दीत 438 बांधकामे अनधिकृत असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. कायद्यानुसार या बांधकामांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी प्रतिज्ञापत्रात दिली आहे.




























































