
<<अरविंद पाटील>>
राधानगरी, पन्हाळा व गगनबावडा तालुक्यांतून वाहणाऱया धामणी नदीवरील राई येथील धामणी मध्यम प्रकल्पातील शासकीय बंधाऱ्यांत पाणी अडविण्यास सुरुवात झाली आहे. पाटबंधारे विभागाकडून नदीवरील सर्व कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱयांमध्ये लोखंडी बरग्यासह प्लॅस्टिक कागद घालून पाणी अडविण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे यावर्षीपासून शेतकऱ्यांना मातीचे बंधारे घालावे लागणार नाहीत. परिणामी खोऱ्यातील मातीचे बंधारे यावर्षीपासून इतिहासजमा होणार असून, शेतकऱ्यांना होत असलेला आर्थिक भुर्दंड, शारीरिक कष्ट व पाण्यासाठी होणारी धावपळ थांबणार आहे. या निर्णयामुळे शेतकरीवर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
स्वातंत्र्यानंतर जिह्यात सर्व नद्यांवर मोठी धरणे होऊन हरितक्रांती झाली आहे. मात्र, जिह्यातील धामणी नदी याला अपवाद ठरली होती. त्यामुळे गेल्या 70 वर्षांपासून धामणी खोऱ्याचा पाण्याअभावी विकास होऊ शकला नाही. येथील शेतकरी कष्टाळू असल्याने गेल्या 40 वर्षांपासून स्वखर्चाने धामणी नदीवर सुमारे 12 ते 15 ठिकाणी मातीचे बंधारे घालून पावसाचे नैसर्गिक वाहून जाणारे पाणी साठवणूक करत होता. याच साठवून ठेवलेल्या पाण्यावर शेतीसह पिण्याच्या पाण्याचे नियोजन काटकसरीने करत होता. मात्र, अशाप्रकारे साठवून ठेवलेले पाणी कसेबसे फेब्रुवारी, मार्च महिन्यांपर्यंत पुरत होते. त्यानंतर नदी कोरडी पडून पिके पाण्याअभावी वाळली जात होती, तर पिण्याच्या पाण्यासाठी येथील जनतेला रानोमाळ भटकंती करावी लागत होती. त्यामुळे कायमस्वरूपी हक्काचे पाणी मिळावे, यासाठी गेल्या 50 वर्षांपासून येथील जनता धामणी प्रकल्पाची मागणी करत आली होती. मात्र, शासनदरबारी वेळोवेळी जनतेला उपेक्षाच सहन करावी लागत होती. अखेर 1995 मध्ये शिवसेना-भाजप युती सरकारने धामणी मध्यम प्रकल्पाला मंजुरी दिली. मात्र, काही ना काही कारणाने हे काम रखडत होते. स्वातंत्र्यसेनानी क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी, भारत पाटणकर,
कॉ. नामदेव गावडे, कॉ. विष्णुपंत इंगवले, प्रा. टी. एल. पाटील यांच्यासह इतर डाव्या पक्षांच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली धामणी खोऱयातील जनतेने मोर्चा काढून सरकारचे लक्ष वेधले होते. त्यानंतर तत्कालीन पन्हाळा-गगनबावडय़ाचे आमदार विनय कोरे यांनी शासनस्तरावर पाठपुरावा करत डिसेंबर 2000 साली प्रत्यक्षात धामणी प्रकल्पाचे काम सुरू केले. त्यानंतरही काम रखडले होते. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करून विशेष बाब म्हणून धामणी प्रकल्पाला गती देण्यास सांगितले होते.
गेल्या तीन वर्षांपासून पुन्हा प्रकल्पाचे काम प्रत्यक्ष सुरू केले होते. मात्र, घळभरणीचे काम मागे राहिल्याने प्रत्यक्ष पाणी साठवणूक करण्यास अडचणी येत होत्या. अखेर महायुतीच्या काळात मे 2025 रोजी काम पूर्ण झाले. सध्या धामणी मध्यम प्रकल्पात सुमारे दीड टीएमसी पाणीसाठा झाला असून, पाणीवाटपाचे नियोजन पाटबंधारे विभागाने सुरू केले आहे. नदीवरील सर्व कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांमध्ये बरगे टाकून पाणी साठवणूक करण्यास सुरुवात केली आहे. पाटबंधारे विभागाने यावर्षी पासून पाणीवाटपाचे नियोजन केल्याने धामणी खोऱ्यातील मातीचे बंधारे शेतकऱ्यांना घालावे लागणार नाहीत.
धामणी प्रकल्पाच्या प्रत्येक आंदोलनात जनतेच्या खांद्याला खांदा लावून आपण गेली तीस वर्षे संघर्ष करत होतो. मात्र, धामणी खोऱ्यातील जनतेच्या व सर्व लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांना अखेर यश आले. सध्या प्रकल्पात पाणी साठवले आहे. याचे समाधान लाभले असून, येथील शेतकऱ्यांच्या हरितक्रांतीचे स्वप्न साकार होणार आहे.
– कॉ. दिनकरराव पाटील, वेतवडे, ता.पन्हाळा



























































