
>> वैश्विक
गेल्या 16 ते 18 नोव्हेंबरच्या निरभ्र रात्री सिंह राशीच्या पार्श्वभूमीवर दिसणारा उल्का वर्षाव पाहायला मुंबईपासून जवळच असलेल्या फार्म हाऊसवर गेलो होतो. भरपूर पाऊस पडून गेल्यानंतरचा जमिनीत मुरलेल्या पाण्याचा गारवा आणि तापमान खूपच खाली आल्याने पहाटे 2 च्या सुमारास पडलेली कडाक्याची थंडी अनुभवत आकाशाकडे नजर लावून बसण्यात गंमत होती. गेली 40 वर्षे हा अनुभव घेतानाच्या अनेक गोष्टी आहेत. कधी केवळ पाच-दहा, तर कधी पन्नास-साठ उल्का एका तासात पडताना दिसल्या आहेत. या वेळी आकाशस्थिती बऱयापैकी अनुकूल होती. शहरापासून दूर गेल्यामुळे हवेचे आणि प्रकाशाचेही प्रदूषक कमी होते. ‘मृग’ नक्षत्र तर अगदी ठळकपणे दिसत होते. उल्का मात्र 15 ते 20 एवढय़ाच दिसल्या. मग गारठा अधिक वाढला आणि कार्यक्रम संपला.
त्या वेळी चाललेल्या खगोली गप्पांमध्ये पहिल्यांदाच असा अवकाशानुभव घेणारे काही होते. त्यांच्या मनात प्रश्न मात्र खूप होते. त्याची उत्तरे देणारा कार्यक्रमच आम्ही एरवी रात्रभराच्या आकाशदर्शनात करतो. आमची खासगी खगोल मैफलही रंगली. टेम्पल टटल धूमकेतूने मागे सोडलेल्या द्रव्यातून या उल्का कशा पडतात त्याची उजळणी झाली आणि 1998 मधल्या संस्मरणीय घटनेलाही उजाळा मिळाला. त्या वर्षी अमावस्येच्या आधीच्या (किंवा नंतरच्याही असेल) उल्का वर्षावाची तारीख होती. आमच्या खगोल मंडळाने सुमारे तीन हजार प्रेक्षकांची अपेक्षा करत तयारी केली.
त्यासाठी आधीच्या रात्री आम्ही 15-20 कार्यकर्ते वांगणीला गेलो. आज काय दिसतंय पाहू या म्हणून जागत राहिलो आणि रात्री साडेअकरापासूनच या अवकाशी आतषबाजीने जो जोर धरला तो अगदी पहाटेपर्यंत. एका तासाला साधारण 200 ते 250 उल्का सटासट पृथ्वीकडे येत होत्या. क्षणकाळ चमकून वातावरणात विलीन होत होत्या. त्याचबरोबर काही मोठय़ा उल्का पृथ्वीच्या वातावरणीय घर्षणाने पेटत्या गोलकासारख्या तेजस्वी दिसत असताना सर्वांचा हर्षोल्हास अक्षरशः गगनात मावत नव्हता. हे पेटते गोलकही उल्काच. त्यांना फायरबॉल म्हणतात. ती रात्र ‘सार्थकी’ लागल्यासारखं वाटलं. उद्या अशीच मजा हजारो लोकांना बघता येईल याची खात्री पटली.
दुसऱया रात्री तब्बल दहा हजार प्रेक्षकांची गर्दी उसळली. संध्याकाळपर्यंत आकाश निरभ्र होतं. दहापर्यंत प्रेक्षकांसाठी खगोलीय स्लाइड शोसुद्धा झाला. रेल्वे, ट्रेन भरभरून कुठून कुठून माणसे गटागटाने येत होती. असा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आम्हाला धन्यवाद देत होती. या साऱयाचं त्या वेळच्या उपलब्ध व्हिडीओ
कॅमेऱ्यावर चित्रण सुरू होतं.
…आणि निसर्गाची लहर फिरली. सवाअकरापर्यंत पन्नास-साठ उल्का पाहून होतात न होतात एवढय़ात काळे ढग अवतरले. जोरदार पावसाला सुरुवात झाली. हा अवकाळी पाऊस थांबेल या आशेवर भिजणारे प्रेक्षकही थांबले होते. ‘‘ज्यांना परत जायचंय त्यांनी जावं’’ असं सांगूनही कोणी हटत नव्हतं. नोंदणी कधीच थांबवली होती. आम्ही लोकांना समजावण्याची पराकाष्ठा करत होतो, पण ‘‘तुमच्याबरोबर आम्हीही भिजतो’’ म्हणणारे हलेनात. उलट आमच्या मोजक्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचा गौरवच होत होता. शिस्त आणि माणुसकीचं विराट दर्शन घडत होतं. माणसांची मनं विराट अवकाशापेक्षाही मोठी असू शकतात याचा प्रत्यय त्या वेळी आला.
पहाटे तीन-साडेतीननंतर पावसाचा जोर ओसरला. ढगांचं मळभ पूर्णपणे विरलं नव्हतं तरी हळूहळू उल्कापतन दिसायला लागलं. आधीच्या रात्री ताशी 200 ते 300 हा बहर होता तो मात्र ढगातच विरून गेला असावा. अर्थातच, शहरी भागात हेसुद्धा कधीच न पाहिल्यामुळे एकेका उल्केबरोबर जल्लोष वाढत होता. एवढय़ा लोकांची चहाचीसुद्धा व्यवस्था करणं शक्य नव्हतं. तरी जेवढा जमेल तेवढा कार्यक्रम आम्ही केला. अनेक कारचे दिवे
ऑन करायला सांगितल्यावर आमच्या प्रेक्षकांनीच ‘लाईट’ची व्यवस्था केली. सगळं चित्रित होत होतं. एका प्रकारे ‘फ्लॉप-शो’ झाला खरा, पण लोकसहकार्याने आणि थोडय़ाशा का होईना पण शहरी भागात दुर्मिळ किंवा अशक्य झालेल्या उल्का वर्षावाच्या अनुभूतीवर लोक खूश होते. या ‘कर्तृत्वा’ची पावती म्हणून वांगणी ग्रामपंचायतीने स्वतःहून आमच्या आकाशदर्शन क्षेत्राकडे जाणाऱया रस्त्याला ‘तारांगण’ मार्ग असं नाव दिलं. एका टीव्ही कार्यक्रमातही कालांतराने त्याचा उल्लेख करण्याची संधी मिळाली आणि पुन्हा कौतुकाचे शब्द कानी आले. तोपर्यंत ‘त्या’ उल्का वर्षावाला सात वर्षे उलटली होती.
पडत्या उल्केला ‘तारा’ समजणं योग्य नाही. तारे सूर्यासारखे विशाल असतात. ते ‘पडत’ नाहीत. याची कल्पना नसलेल्या हॉलीवूड- बॉलीवूड चित्रपटातले प्रेमी परस्परांना ‘शूटिंग स्टार’ ऊर्फ कोसळती उल्का दाखवून ‘‘तू काय मागितलंस?’’ असं विचारतात तेव्हा हसू येतं. वैज्ञानिक विचारापासून केवळ सामान्य माणसंच नव्हे, तर ‘सुशिक्षित’ म्हणवणारेही किती दूर आहेत हे लक्षात येतं आणि आमच्यासारख्या खगोल अभ्यासकांच्या लक्षात राहतो तो असा एखादा ‘ग्रॅण्ड फ्लॉप शो?’ त्यातूनही पुढच्या कार्यक्रमांसाठी स्फूर्ती मिळते हे महत्त्वाचे.






























































