
उत्तर प्रदेशातील बलिया येथे एका लग्न समारंभात स्टेज कोसळण्याची दुर्घटना घडली आहे. मात्र, सुदैवाने यात कोणीही जखमी झालेले नाही. स्टेज कोसळला त्यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष, माजी खासदार आणि इतर नेते तेथे उपस्थित होते. वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी ते सर्व स्टेजवर चढले आणि अचानक स्टेज कोसळला. त्यामुळे वधूवरांसह ते सर्व खाली पडले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यात एका लग्न समारंभात वधू-वरांचा स्टेज अचानक कोसळल्याने गोंधळ उडाला. बुधवारी संध्याकाळी उशिरा स्थानिक भाजप कार्यकर्त्याच्या भावाच्या स्वागत समारंभात ही घटना घडली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले की, वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी गर्दी स्टेजवर जमली असताना अचानक स्टेज कोसळला.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात भाजपचे माजी खासदार, भाजप जिल्हाध्यक्ष संजय मिश्रा आणि वधू-वरांच्या मागे उभे असलेले अनेक नेते एकत्र पडत असल्याचे दिसून येत आहे. या घटनेने लगन समारंभात गोंधळ उडाला. भाजप जिल्हाध्यक्ष संजय मिश्रा म्हणाले की, हा कार्यक्रम पक्षाच्या एका कार्यकर्त्याच्या कुटुंबाने आयोजित केला होता. आम्ही सर्वजण वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी स्टेजवर चढलो आणि अचानक स्टेज खालून तुटला. त्यामुळे स्टेजसह आम्ही सर्वजण खाली पडलो. सुदैवाने या घटनेत कोणीही गंभीर जखमी झाले नाही. आयोजकांनी सुरक्षा उपाय आणि स्टेजची क्षमता विचारात घ्यायला हवी होती असे त्यांनी सांगितले. तसेच स्टेजवर जास्त गर्दी झाल्याने स्टेज तूटून कोसळल्याचे सांगण्यात येत आहे.
उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यात भाजप जिल्हाध्यक्ष, माजी खासदार आणि इतर अनेक भाजप नेते वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी आले होते. फोटो काढण्यासाठी स्टेजवर उभे असताना स्टेजच कोसळला. pic.twitter.com/aGrPo4SJxl
— Saamana Online (@SaamanaOnline) November 28, 2025
स्टेज लाकूड आणि लोखंडी जाळीने बनलेला होता. मात्र, स्टेजवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने स्टेज कोसळला. घटनेनंतर समारंभ काही काळ थांबवण्यात आला. गोंधळ कमी झाल्यानंतर समारंभ पुन्हा सुरू झाला. या घटनेबाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. अनेकांनी म्हटले की प्रत्येक लग्नात स्टेजवर जास्त गर्दी असणे मोठ्या अपघाताला आमंत्रण देते.



























































