
ना वनावर प्रेम, ना धर्मावर; फक्त ठराविक कॉन्ट्रॅक्टरच्या हितासाठी हा सगळा खेळ रचला, असं म्हणत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. नाशिक येथे कुंभमेळ्यासाठी साधुग्राम उभारण्याच्या नावाखाली तपोवनातील झाडांची तोडणी करण्याच्या महापालिका निर्णयाविरोधात नाशिकमध्ये स्थानिक रहिवासी, पर्यावरणप्रेमी आणि शिवसैनिकांनी रविवारी आंदोलन केलं. याच मुद्द्यावरून आदित्य ठाकरे यांनी X वर एक पोस्ट करत टीका केली आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले की, “नाशिकमध्ये स्थानिक रहिवासी, पर्यावरणप्रेमी आणि आमच्या पक्षाचे पदाधिकारी-कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन तपोवन वाचवण्यासाठी काल आंदोलन केलं. कारण हा मुद्दा राजकारणाचा नाही, तो निसर्गाचा, जीवनाचा आणि नाशिकच्या अस्तित्वाचा आहे.” ते म्हणाले, “आजूबाजूला पाहिलं की दिसतं ते झाडांची कत्तल आणि वाढतं प्रदूषण. तरीसुद्धा भाजप सरकार तपोवन (म्हणजेच तपश्चर्येचं पवित्र वन) तोडून साधुग्राम उभारणार असल्याचं सांगत आहे. पण खरा हेतू काही वेगळाच आहे. त्या ठिकाणी मोठं एक्झिबिशन सेंटर, हॉल, बंगला उभारण्याची योजना आखली गेली आहे. टेंडरही काढलं गेलं आहे.”
आदित्य ठाकरे म्हणाले, “ना वनावर प्रेम, ना धर्मावर, फक्त ठराविक कॉन्ट्रॅक्टरच्या हितासाठी हा सगळा खेळ रचला, असं स्पष्ट जाणवतं. नाशिकवर एवढी दादागिरी कोणासाठी? नाशिकचं आणि त्या लाडक्या कॉन्ट्रॅक्टरचं काय देणंघेणं? तपोवन तोडून तिथे एक्झिबिशन हॉल बांधणार? आणि एक्झिबिशन कसली प्रदूषणाची?” ते पुढे म्हणाले की, “आमचं सरकार असताना, जानेवारी २०२२ मध्ये पर्यावरणमंत्री म्हणून मी नाशिकमधील वडाचं झाड वाचवलं होतं, आणि अजनी पर्वतावरील वनस्पतींनाही विनाशवादी कॉन्ट्रॅक्टर प्रेमींचा हात लागू दिला नव्हता. कारण निसर्गाचं रक्षण हेच खरं कर्तव्य. तपोवन वाचलं पाहिजे. तपश्चर्येचं वन कॉन्ट्रॅक्टरच्या ताब्यात जाऊ देणार नाही.”
नाशिकमध्ये स्थानिक रहिवासी, पर्यावरणप्रेमी आणि आमच्या पक्षाचे पदाधिकारी-कार्यकर्ते ह्यांनी एकत्र येऊन तपोवन वाचवण्यासाठी काल आंदोलन केलं.
कारण हा मुद्दा राजकारणाचा नाही, तो निसर्गाचा, जीवनाचा आणि नाशिकच्या अस्तित्वाचा आहे.आजूबाजूला पाहिलं की दिसतं ते झाडांची कत्तल आणि वाढतं… pic.twitter.com/94iU1DQOGK
— Aaditya Thackeray (@AUThackeray) December 1, 2025


























































