
नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभसाठी तपोवनमधील वृक्षतोडीविरोधात सयाजी शिंदे यांनी संताप व्यक्त केला होता. आता याच विषयावर लेखक पटकथाकार अरविंद जगताप यांनीही सरकारविरोधात आवाज उठवला आहे. जगताप यांनी सरकारविरोधात मार्मिक पोस्ट करत चांगलेच खडे बोल सुनावले आहेत.
अरविंद जगताप यांनी कायमच समाजातील महत्त्वाच्या विषयांवर ठामपणे मत व्यक्त केलं आहे. नाशिकमध्ये तपोवनातील वृक्षतोडीवर ते पोस्टच्या माध्यमातून त्यांनी परखड भाष्य केले आहे. “एक एक मोठं झाड तोडून दहा दहा नवी रोपं लावायची असतील, तर मग एक एक मोठा मंत्री काढून त्याजागी दहा दहा पीए ठेवले तरी काय हरकत आहे?” असा थेट प्रश्न त्यांनी विचारला आहे. या पोस्टवर नेटकऱ्यांनीही वृक्षतोडीला विरोध दर्शवला आहे.
रविवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे पदाधिकारी व शिवसैनिकांनी तपोवनात दाखल होत जोरदार आंदोलन छेडले होते. यावेळी त्यांनी हातात निषेध फलक घेतले होते. तसेच राज्य सरकारविरोधात आणि महापालिकेविरोधात घोषणा दिल्या होत्या. अभिनेते सयाजी शिंदे यांनीही तपोवनातील वृक्षतोडीविरोधात सरकारला एकाही झाडाला हात लावू नका, झुडूपचं काय इथल्या गवताच्या काडीला देखील हात लागायला नको, असा इशारा सयाजी शिंदे यांनी सरकारला दिला आहे.



























































