
काशिमीरा येथील सिंगापूर इंटरनॅशनल शाळा बॉम्बने उडवून देऊ, अशी धमकी अज्ञात समाजकंटकाने आज सकाळी ६ वाजता दिली. समाजकंटकाने धमकीचा मेल पाठवल्याचे उघडकीस आल्यानंतर शाळा व्यवस्थापनाची एकच पळापळ उडाली. पोलिसांनी डॉग स्कॉडसह शाळेत धाव घेऊन सर्व परिसर पिंजून काढला. मात्र त्यांना शाळेत कोणती संशयास्पद वस्तू आढळून आली नाही.
शाळा बॉम्बने उडवून देऊ, असा धमकीचा मेल व्यवस्थापनाच्या निदर्शनास आल्यानंतर याप्रकरणी तातडीने पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. त्यानुसार बॉम्बशोधक पथक, डॉग स्कॉड आणि स्थानिक पोलिसांचा मोठा फौजफाटा शाळेत आला. शाळेच्या सर्व वर्गांसह संपूर्ण परिसर पोलिसांनी पिंजून काढला. सर्व साहित्याची तपासणी केली. मात्र शाळेत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही, असे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी सांगितले. हा धमकीचा मेल कोणी पाठवला, तो कोणत्या मेलवरून आला, याचा पोलीस कसून शोध घेत आहेत.
पालकांनी घाबरून जाऊ नये
शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी अज्ञात समाजकंटकाने दिल्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला. विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अज्ञात समाजकंटकाने हा खोडसाळपणा केला आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि पालकांनी घाबरून जाऊ नये. या आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, असे काशिमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी सांगितले.































































