
श्रीलंकेला दित्वा चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे. चक्रीवादळाने अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे तेथे मोठे संकंट आले आहे. या विनाशकारी पुरपरिस्थितीत श्रीलंकेत मदत पाठवण्याच्या नावाखाली पाकिस्तानने हिंदुस्थानविरोधात कांगावा सुरू केला आहे. पाकिस्तानने दावा केला की, ते श्रीलंकेला मदत साहित्य पाठवू इच्छितात. मात्र, हिंदुस्थानने त्यांच्या हवाई क्षेत्रातून पाकिस्तानला उड्डाणांसाठी परवानगी देत नव्हता. पाकिस्तानच्या खोट्या आरोपांचे खंडण करण्यासाठी हिंदुस्थानने अवघ्या ४ तासांत परवानगी दिली आहे. त्यामुळे मदतीचा आव आणत खोटारडेपणा करणारे पाकडे फक्त चार तासातच तोंडावर आपटले आहेत.
पाकिस्तानचा खोटा कांगावा उघड करण्यासाठी हिंदुस्थानने पाकिस्तानला हवाई क्षेत्र वापरण्याची तात्काळ परवानगी दिली आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर दोन्ही देशांमधील ही एक महत्त्वाची घडामोड मानली जात आहे. पाकिस्तानने अद्याप हिंदुस्थानी विमानांना त्यांचे हवाई क्षेत्र वापरण्याची परवानगी दिलेली नाही. तथापि, हिंदुस्थानचा हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. श्रीलंकेतील विनाशकारी पुरपरिस्थितीत पाकिस्तान श्रीलंकेला मदत साहित्य पाठवू इच्छित होते. हे करण्यासाठी, पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीतून जावे लागेल. हिंदुस्थानने मानवतावादी दृष्टीकोनातून पाकिस्तानी विमानांना ही परवानगी दिली आहे.
या गंभीर मुद्द्यावरही पाकड्यांनी त्यांच्या सवयीप्रमाणे हिंदुस्थानविरुद्ध अपप्रचार करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानी माध्यमांनी दावा केला की नवी दिल्लीने पाकिस्तानी विमानांना त्यांच्या हवाई हद्दीत प्रवेश नाकारला आहे. हिंदुस्थानने अवघ्या चार तासांतच विनंतीवर प्रक्रिया केली आणि पाकिस्तानी विमानांना हिंदुस्थानच्या हवाई क्षेत्राचा वापर करण्याची परवानगी देण्यात आली. हिंदुस्थानने पाकिस्तानचा परवानगी नाकारल्याचा दावा फेटाळून लावला. हिंदुस्थानने मानवतावादी दृष्टीकोनातून मदत वाहून नेणाऱ्या विमानांना परवानगी देण्यासाठी जलद गतीने कार्यवाही केली आहे, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.


























































