
पुण्यातील मुंढवा परिसरातील जमीन घोटाळाप्रकरणी शीतल तेजवानी हिला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया’ कंपनीचा सहभाग समोर आला आहे. यावरून सरकारवर टीका होत असून तेजवानीला गजाआड केले मग कंपनीत 99 टक्के मालक असलेले पार्थ पवार मोकाट का, असा सवाल करत शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी सरकारला जाब विचारला आहे.
अमेडिया कंपनीत पार्थ पवार यांची 99 टक्के भागीदारी आहे, तर दिग्विजय पाटील हे केवळ एक टक्का भागीदार आहेत. मात्र या घोटाळय़ात दिग्विजय पाटील आणि अमेडिया कंपनीला जमीन विकणाऱ्या शीतल तेजवानी यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. पार्थ पवार यांच्याबाबत मात्र तपास यंत्रणा गप्प आहेत, असा आरोप विरोधकांकडून होत आहे.
अंबादास दानवे यांनी या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा साधला आहे. या जमीन खरेदीत झालेली मुद्रांक शुल्कमाफी राजकीय दबावाशिवाय होणे शक्य नाही आणि त्याची कल्पना नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सांगणे म्हणजे जनतेला शुद्ध वेडे बनवण्यासारखे आहे, तेसुद्धा बहुमताच्या जोरावर, अशी टीका करतानाच अंबादास दानवे यांनी पुढील प्रश्न उपस्थित केले आहेत.
जमीन देणारी व्यक्ती अटकेत असेल तर मग घेणाऱ्या व्यक्तीला, त्याच्या पार्टनरला अटक का नाही?
पार्थ पवार प्रकरणात कंपनीने उत्तर देण्यासाठी अजून किती दिवस ‘मुदतवाढ-मुदतवाढ’ खेळणार आहात?
अमेडिया कंपनीत केवळ एक टक्का भागधारक दिग्विजय हा 99 टक्के भागधारक असलेल्या पार्थ पवारांच्या मर्जीशिवाय सायनिंग अथॉरिटी झाला का?
मुद्रांक शुल्क माफ करणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे सरकार कधी जाहीर करणार?




























































