देवरूख नगरपंचायतच्या निवडणुकीनंतर मतदानयंत्रे ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमला सुरक्षा कवच; सशस्त्र पोलिसांचा पहारा

संगमेश्वर तालुक्यातील देवरूख नगरपंचायतीच्या निवडणुकीनंतर मतदान यंत्रे नगरपंचायत कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर अत्यंत कडोकोट सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आली आहेत. मतदानयंत्रे ठेवण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षिततेसाठी अभेद्य सुरक्षा कवच असून २४ तास बंदुकधारी पोलीसांचा जागता पहारा ठेवण्यात आला आहे.

तालुक्यातील देवरूख नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी व नगरसेवक पदासाठी १७ प्रभागाकांकरीता मंगळवारी शांततेत मतदान पार पडले. या निवडणुकांचा ३ डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार होता. मात्र हा निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे मतदान यंत्रे नगर पंचायतीच्या दुसऱ्या मजल्यावर सभागृहात ठेवण्यात आली आहेत. या मतदान यंत्रांसाठी स्ट्रॉंग रूम बनविण्यात आला आहे. या मतदान यंत्रांच्या सुरक्षिततेसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

स्ट्रॉंग रूमजवळ एसआरपीएफचे बंदुकधारी कमांडो, पहिल्या मजल्यावर पोलीस मुख्यालयाचा गार्ड, तळमजल्यावर देवरूख पोलीस स्टेशनचा बंदुकधारी पोलीस कर्मचारी तसेच नगरपंचायत परिसरात रात्रंदिवस गस्त घालणारे पोलीस कार्यरत आहेत. अशाप्रकारे मतदान यंत्रांच्या सुरक्षिततेसाठी अभेद्य असे सुरक्षा कवच पुरवण्यात आले आहे. स्ट्रॉंग रूमला २४ तास बंदुकधारी पोलीसांचा पहारा ठेवण्यात आला आहे. कोणीही स्ट्रॉंग रूमजवळ पोहचणार नाही, याची चोख खबरदारी घेण्यात आली आहे. ही कडेकोट सुरक्षा व्यवस्था दि. २१ तारखेपर्यंत असणार आहे.