महामानवाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी मुंबईत दाखल; देशाच्या कानाकोपऱ्यातून भीमसैनिक चैत्यभूमीवर

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 69 व्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर अनुयायांचा सागर लोटला आहे. संविधानाच्या माध्यमातून जगण्याचा हक्क मिळवून देणाऱ्या या महामानवाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो अनुयायी मुंबईत दाखल झाले आहेत.

देशात मानवतेची क्रांती घडविणारे, जगातील सर्वाधिक बळकट लोकशाहीचे जनक, प्रकांडपंडित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समोर नतमस्तक होण्यासाठी 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनी लाखो अनुयायी व नागरिक चैत्यभूमीवर येत असतात. यंदाही 4 डिसेंबरपासूनच महामानवास वंदन करण्याकरिता उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल, पंजाब, दिल्ली, मध्य प्रदेश, कर्नाटक आदी विविध राज्यांतून अनुयायी मुंबईमध्ये कुटुंबकबिल्यासह दाखल होत आहेत. आज संध्याकाळपासून चैत्यभूमी ते वरळीपर्यंत अनुयायी व भीमसैनिकांची लांबच लांब रांग लागली होती. प्रत्येक अनुयायी शिस्तीत रांग लावून मुक्तिदात्याला अभिवादन करत होता.

पोलिसांचा चोख बंदोबस्त

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याकरिता मोठय़ा संख्येने जनसमुदाय येत असल्याने चैत्यभूमी, छत्रपती शिवाजी महाराज मैदान, दादर परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. तीन अपर पोलीस आयुक्त, आठ पोलीस उपायुक्त, 11 सहाय्यक आयुक्त, 493 पोलीस अधिकारी, 4640 पोलीस अंमलदार, होमगार्ड असा तगडा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे.

‘दीपस्तंभ’ पुस्तकाचे प्रकाशन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार, विविध शासकीय संस्थांकडून विद्यार्थ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या योजना, शिष्यवृत्ती, नोकरीविषयक माहिती असलेल्या ‘दीपस्तंभ’ पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवारी अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष, समता सैनिक दलाचे अध्यक्ष डॉ. भीमराव आंबेडकर, उपआयुक्त प्रशांत सपकाळे, सहाय्यक आयुक्त विनायक विसपुते आदी उपस्थित होते.

समता सैनिक दलाचे जवानही तैनात

बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाचे जवानदेखील ठिकठिकाणी तैनात असून अनुयायांना मार्गदर्शन करण्याबरोबर, कुठलीही गडबड होऊ नये याकरिता पोलिसांना मदत करीत आहेत.

त्यामुळे हिरमोड

डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक पूर्णपणे तयार होण्यास आणखी वर्ष लागणार आहे. ते लवकरात लवकर जनतेसाठी खुले व्हावे अशी लोकांची अपेक्षा आहे. यंदा 6 डिसेंबरपूर्वी स्मारकाच्या गेट जवळ बाबासाहेबांच्या भव्य पुतळ्याच्या डाव्या पायाचा बूट अनुयायांना पाहण्यासाठी ठेवण्यात येणार होता; परंतु तसे केल्याने अनुयायांचा हिरमोड होतो आहे.