
भाईंदरमध्ये मराठी माणसाला घर नाकारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी स्टिंग ऑपरेशन करीत बालाजी भुतडा बिल्डर्स याच्या स्कायलाइन बांधकाम प्रकल्पातील मुजोरीचा पर्दाफाश केला आहे. आमच्या प्रकल्पात मराठी माणसांना नव्हे, तर जैन, मारवाडी, गुजराती व ब्राह्मणांनाच प्राधान्य देण्यात येईल, असे सांगून मराठी माणसांची क्रूर चेष्टा केली आहे. या मराठीद्वेष्टय़ा बालाजी भुतडा बिल्डरवर तत्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणीही करण्यात आली आहे.
मीरा रोडमध्ये मराठी माणसांसह मुस्लिम व ख्रिश्चन बांधवांना घरे नाकारल्याचा प्रकार घडला होता. फक्त जैन, गुजराती व मारवाडी यांनाच फ्लॅट विकण्यात येतील, अशी जाहिरातबाजीही झाली होती. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. मराठी माणसांना घरे नाकारण्याचे लोण आता भाईंदरमध्येदेखील पोहोचले आहे. भाईंदर पश्चिम येथील स्कायलाइन बांधकाम प्रकल्पामध्ये मराठी माणसाला घर नाकारल्याचे समजताच काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी सिद्धेश राणे, रवी खरात, किरण परुळेकर आदींनी बिल्डरच्या
कार्यालयावर धडक दिली.
कठोर कारवाई करा
भाईंदरसारख्या ठिकाणी कवडीमोल भावाने जमीन विकत घेऊन परप्रांतीय बिल्डर टोलेजंग इमारती बांधतात. त्यातून करोडो रुपयांचा नफादेखील मिळवला जातो. पण येथील स्थानिक मराठी माणसांना घर नाकारण्याचे कारण काय, असा थेट सवाल काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बालाजी भुतडा बिल्डर्सला केला. तेथील कर्मचारी व अधिकाऱ्यांची बोलतीच बंद झाली. त्यांनी थातूरमातूर उत्तरे दिली. दरम्यान, यापुढे पुन्हा असे घडले तर याद राखा, असा इशारा देण्यात आला आहे.

























































