
सतत नूतनीकरण होणारी कंत्राटी सेवा कायमस्वरूपाचीच मानली जाईल, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. एखाद्या आस्थापनेत सुरुवातीला कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सेवा त्यांच्या कामाच्या स्वरूपाने नंतर कायमचीच असल्याचे स्पष्ट होते. न्यायालयाने या सत्याचा विचार करायला हवा. कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा वारंवार नूतनीकरण केली जात असेल. पगारवाढ दिली जात असेल. या कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक सेवेचे काम वर्षानुवर्षे दिले जात असेल तर अशी सेवा कायमच असल्याचे ग्राह्य धरण्यात येईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
अग्निशमन दलातील 30 कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा कायम करण्यास सिडकोने नकार दिला होता. न्या. अमित बोरकर यांच्या एकल पीठाने सिडकोला चांगलीच चपराक दिली. हे कर्मचारी अत्यावश्यक सेवा देतात. त्यांच्या सेवेचे वारंवार नूतनीकरण केले जात होते. त्यामुळे त्यांची सेवा कायम स्वरूपाची आहे, असा निकाल न्यायालयाने दिला.
सेवा संपूर्ण वर्ष हवी
अग्निशमन दलाची सेवा विशिष्ट कालावधीसाठी नसते. ही सेवा वर्षभर लागते. या कर्मचाऱ्यांमुळे अग्निशमन दल कार्यरत आहे. त्यांना कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन दिले जात होते. परिणामी सिडको या कर्मचाऱ्यांना पंत्राटी समजत असली तरी त्यांची सेवा कायम स्वरूपाची आहे, असा निर्वाळा खंडपीठाने दिला.
काय आहे प्रकरण…
या कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा कायम करण्याचे आदेश औद्योगिक न्यायालयाने सिडकोला दिले. याला सिडकोने याचिकेद्वारे आव्हान दिले होते. न्या. बोरकर यांनी औद्योगिक न्यायालयाच्या आदेशावर शिक्कामोर्तब केले. 12 आठवडय़ांत या कर्मचाऱ्यांची सेवा सिडकोने कायम करावी, असेही आदेश न्यायालयाने दिले.



























































