
धारावी मेघवाडीतील गणेशनगर येथील 41 हून अधिक झोपडय़ा बळजबरीने पाडण्याचा इशारा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) नोटिशीद्वारे दिला आहे. त्याला विरोध करत धारावीतील एकही झोपडी तोडू देणार नाही, अशी भूमिका घेत धारावी बचाव आंदोलनाच्या वतीने शनिवारी इशारा सभा आयोजित केली आहे. ती उधळून लावण्यासाठी अदानी पंपनीने कारस्थान रचले आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत भव्य सभा होणारच, असा निर्धार संघटनेने व्यक्त केला आहे.
आदित्य ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती
धारावीतील कामराज हायस्कूलसमोर येत्या रविवारी 7 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता इशारा सभा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती धारावी बचाव आंदोलनाचे नेते, माजी आमदार बाबुराव माने यांनी दिली. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव व धारावी तालुका अध्यक्ष उलेश गजाकोष, सपाचे आबू आझमी, रहिम मोटारवाला आदी उपस्थित राहणार आहेत.
सरकारने अदानी कंपनीला धारावीतील 600 एकर व बाहेरची 900 एकर अशी 1500 एकर जागा दिली. मग एवढय़ा मोठय़ा जागांमध्ये मुंबईतील इतर झोपडपट्टय़ा वसवणार काय? कुर्ला मदर डेअरीची जागा ही बॉटॅनिकल गार्डनसाठी राखीव आहे. म्हणजे मुंबईसाठी हे एक हरित क्षेत्र विकसित करण्याचे सरकारचे धोरण असतानाही कुर्ला मदर डेअरीची जागा अदानीच्या घशात कशाला घातली, असा सवाल माने यांनी उपस्थित केला आहे.
असे आहे प्रकरण…
गणेशनगरमधील 42 झोपडय़ा तोडण्याबाबत आणि त्या झोपडय़ांच्या बदल्यात झोपडपट्टीवासीयांना अनामत रक्कम व भाडे देण्याबाबत अदानी पंपनीतील मे. नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या पंपनीची या झोपडपट्टीवासीयांशी चर्चा झालेली आहे. असे असतानाही या झोपडय़ा खाली करून मिळालेल्या नाहीत म्हणून विकासक मे. नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडची नोटीस आम्हाला आल्याचे सांगण्यात येत आहे.





























































